ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 08:56 AM2024-10-01T08:56:05+5:302024-10-01T08:56:24+5:30
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी.एम. पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या जागा परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या पत्नी बीएम पार्वती यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरीटीला पत्र लिहिले आहे. त्यांनी MUDA च्या जागा परत करण्याची ऑफर दिली आहे. MUDA आयुक्तांना पत्र लिहून त्यांना वाटप केलेले १४ भूखंड परत करणार असल्याचे सांगितले आहे. पार्वती म्हणाल्या की, ३ एकर आणि १६ गुंठे जमिनीच्या बदल्यात वेगळ्या ठिकाणी दिलेले १४ भूखंड परत करायचे आहेत, असं यात म्हटले आहे.
पत्रात लिहिले आहे की, 'मी भूखंडांचा ताबा म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंटला परत देत आहे. कृपया MUDA ने लवकरात लवकर याबाबत आवश्यक पावले उचलावीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात ईडीने गुन्हा नोंदवल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकायुक्तांच्या एफआयआरची दखल घेत ईडीने MUDA प्रकरणात मुख्यमंत्री, त्यांची पत्नी पार्वती आणि इतर काही जणांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयाने MUDA द्वारे पर्वती यांना १४ भूखंड वाटपातील अनियमिततेबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिलेली मंजुरी कायम ठेवली होती. यानंतर बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने या प्रकरणाची लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले. लोकायुक्तांनी सीएम सिद्धरामय्या, त्यांची पत्नी पार्वती, त्यांचे मेहुणे मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवली आहेत. आता ईडीनेही या प्रकरणात तपास सुरू केला आहे. ईडीने सिद्धरामय्या यांच्याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना गेल्या आठवड्यात मोठा धक्का बसला. उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती, यात त्यांनी राज्यपाल यांनी त्यांच्यावर खटला चालवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. मात्र, सीएम सिद्धरामय्या यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग अद्याप खुला आहे.