बंगळुरू- कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारच्या बहुमताची आज परीक्षा आहे. कर्नाटकातल्या 222 सदस्यांच्या विधानसभेत भाजपाकडे 104 आमदार आहेत, तर जेडीएस-काँग्रेस आघाडीचे 117 एवढ्या आमदारांचं संख्याबळ आहे. कुमारस्वामी बहुमत सिद्ध करतील की नाही हे चित्र समोर आलं असतानाच काँग्रेसनं कुमारस्वामींच्या 5 वर्षांच्या समर्थनाचा निर्णय आताच घेता येणार नाही, असं स्पष्ट केलंय.काँग्रेस-जेडीएस आघाडीचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या या विधानामुळे कुमारस्वामी 5 वर्षं मुख्यमंत्री राहतील की नाही, याबाबत शंका उपस्थित झाली आहे. जी. परमेश्वर म्हणाले, कुमारस्वामी 5 वर्षं मुख्यमंत्री राहतील की या 5 वर्षांत आमचा कोणी मुख्यमंत्री होईल, याबाबत अद्याप निर्णय होणं बाकी आहे. जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार आज बहुमत सिद्ध करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी केलेल्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे.विश्वासदर्शक ठरावाच्या एक दिवस आधीच जी. परमेश्वर म्हणाले, जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार कुमारस्वामीच 5 वर्षं मुख्यमंत्रिपदी राहतील, यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. आम्ही त्यांच्या रुपरेषेवर अद्याप चर्चा केलेली नाही. यावर अद्याप निर्णय येणं बाकी आहे. कोणती खाती आम्हाला मिळणार आहेत आणि कोणती खाती ते स्वतःकडे ठेवणार आहेत, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. तसेच पाच वर्षं तेच मुख्यमंत्री राहतील की मुख्यमंत्रिपद आम्हालाही मिळेल, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. जेडीएसबरोबरच्या चर्चेनंतर काँग्रेसला किती फायदा आणि नुकसान होतंय, याचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ, असं जी. परमेश्वर म्हणाले आहेत.तसेच काँग्रेस आणि जेडीएस 30-30 महिन्यांनी सरकारचा फॉर्म्युला बदलण्याच्या निर्णयावर काम करत असल्याच्या वृत्ताचंही गेल्या काही दिवसांपूर्वी कुमारस्वामी यांनी खंडन केलं होतं. जेडीएसबरोबर आघाडी केल्यानं काँग्रेसमधले बरेच आमदार नाराज असल्याचीही चर्चा आहे. परंतु जी. परमेश्वर यांनी राहुल गांधी यांच्याकडे कोणत्याही नेत्यानं पद मागितलेलं नाही, अशी माहिती सार्वजनिक केली होती. काँग्रेसमध्येही अनेक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदं व्यवस्थितरीत्या सांभाळू शकणारे आमदार आहेत. त्यामुळे जेडीएस आणि काँग्रेसची सत्ता कर्नाटकात किती काळ टिकते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.