नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये एक भीषण घटना घडली आहे. चिक्काबल्लापूर जिल्ह्यात मंगळवारी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना झाली आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या चिक्काबल्लापूर जिल्ह्यामध्ये स्फोटात मृत आणि जखमी झालेल्या व्यक्तींनी जिलेटिनच्या कांड्यांचा बेकायदेशीरपणे साठा केला होता. पोलिसांच्या छापाच्या भीतीने त्यांनी जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच अचानक हा मोठा स्फोट झाला आहे. चिक्काबल्लापुरचे जिल्हा प्रभारी डॉ. के सुधाकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. ही एक धक्कादायक घटना आहे. ही सर्व स्फोटकं बेकायदेशीरपणे साठा करून ठेवली होती. या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल असं सुधाकर यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मोदींनी ट्विट केलं असून "कर्नाटकातील चिक्काबल्लापूर येथे झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाली असून त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती मिळो. जखमी झालेले लोक लवकर बरे होवोत अशी मी प्रार्थना करतो" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बी. एस. येडियुरप्पा यांनी "जिलेटिनच्या स्फोटांमुळे चिक्काबल्लापूर गावात हिरेनागावल्ली गावाजवळ सहा जणांचा मृत्यू झाला असून ही धक्कादायक बाब आहे. जिल्हा प्रभारी मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत" अशी माहिती दिली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.