महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून वातावरण तापत असताना गेल्या महिन्यात शेजारच्या कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापन केल्याची घोषणा केली होती. याला राज्यातील कन्नड संघटनांनी विरोध करत ५ डिसेंबरला राज्यव्यापी बंद पुकारला होता. आज बेंगळुरूपासून राज्यभरात बंद पाळण्यात आला आहे.
बेंगळुरु पोलिसांनी कन्नड संघटनांच्या १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नेहमीच अशा बंदवेळी समाजविघातक कृत्ये केली जातात. बेंगळुरुच्या शिवाजी नगरमध्येही सर्व दुकाने, आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वी बेळगावच्या अनगोळ भागात मराठा विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे अभिनंदन करण्यासाठी लावलेल्या मराठी भाषेतील फलकाला दोघा कन्नड समाजकंटकांनी काळे फासल्याचा निंद्य प्रकार घडला होता.
या अभिनंदनपर फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा आणि बेळगाव दक्षिणच्या आमदारांसह मराठी समाजाच्या कांही कार्यकर्त्यांची छायाचित्र छापण्यात आली होती. या फलकाला मराठी द्वेष्ट्या कन्नडिगांनी काळे फासल्यानंतर अनगोळ परिसरात संतापाची लाट उसळून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गळ्यात लाल -पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरूणाने फलकाला काळे फासण्याचे कृत्य केले असून त्याचे व्हिडिओ चित्रण सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. सदर घटना अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडली असून ती घडत असताना कोणीच आक्षेप घेतला नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे फलकाला काळे पासून ते तरुण आरामात बिनबोभाट निघून गेले. सदर घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून तो फलक तातडीने तिथून हटविण्यात आला आहे.