बंगळुरू : पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडालेला असतानाच कर्नाटक सरकारने तेथील सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक निर्णय दिला आहे. राजस्थान, आंध्रप्रदेशनंतर आता कर्नाटकातपेट्रोल, डिझेल स्वस्त झाले आहे. कर्नाटक सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी दोन रुपयाने कपात केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त करत असल्याची घोषणा केली.
काँग्रेसने भाजपावर इंधन दरवाढीवरून हल्ला चढवला आहे. 'आमच्या सरकारने राज्यात इंधनाचे दर कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आज मोदींचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासाठी ही वाढदिवसाची भेट आहे', असा टोला लगावतानाच 'जर राज्य सरकार इंधन दर कमी करू शकते तर केंद्र सरकार इंधन दरात कपात का करत नाही?,' असा सवाल काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष दिनेश राव यांनी केला.
आंतरराष्ट्रीय बाजारातील रुपयाची घसरण आणि वाढवलेले कर यामुळे नागरिकांना महागाईचा फटका बसत असून आजही मुंबई आणि दिल्लीत पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. मागील काही महिन्यांपासून पेट्रोल डिझेलचे दर कमालीचे वाढले आहेत. सहा महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये पेट्रोल 80.11 तर 66.85 रुपयांना मिळत होते. मात्र, गेल्या सहा महिन्यात पेट्रोल 9.27 आणि डिझेल 11.50 रुपयांनी वाढले आहे. आज पेट्रेलचा मुंबईतील दर 89.44 तर डिझेलचा दर 78.33 रुपये प्रती लिटर आहे. तर दिल्ली मध्ये पेट्रोल 82.06 आणि डिझेल 73.78 रुपये आहे. दिल्लीमध्ये डिझेल 6 पैशांनी वाढले आहे.