बेंगळुरू - उत्तराखंडनंतर आता कर्नाटक भाजपमध्ये हालचालींना मोठा वेग आला आहे. यातच, कर्नाटकचेमुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी आपल्या राजीनाम्यासंदर्भातील वृत्ताचे खंडन केले आहे. या बातम्या अफवा असल्याचे म्हणत, आपण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राज्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली आहे. राजीनामा देण्यासंदर्भातील वृत्तात कसल्याही प्रकारचे तथ्य नाही, असे येदियुरप्पा यांनी म्हटले आहे. (Karnataka CM BS Yediyurappa denies rsignation related news)
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना येदियुरप्पा म्हणाले, 'मी दिल्लीत पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह आणि जेपी नड्डा यांच्याशी चर्चा केली. मेकेदातू प्रकल्पासंदर्भात जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली. मी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दिल्लीला जाणार आहे. नड्डा यांच्यासोबत मी कर्नाटक भाजपसंदर्भात चर्चा केली. मी राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार बनविण्यासाठी काम करेल.'
मुलासाठी केंद्रात मंत्रीपदाची इच्छा! -बीएस येदियुरप्पा राजीनाम्यासंदर्भातील वृत्त नाकारत असले तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येदीयुरप्पा यांनी प्रकृती आणि वय लक्षात घेत राजीनामा द्यावा, अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे. तसेच येदियुरप्पा यांनीही राजीनामा देऊ केला आहे, असेही सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे, मानले जाते, की पुढील एक ते दोन दिवसांत ते खुर्ची सोडू शकतात. तसेय मुलाला केंद्रीयमंत्रीमंडळात पद मिळावे, अशीही येदियुरप्पा यांची इच्छा असल्याचे समजते.
2 नाव मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये - बीएस येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याची चर्चा सरू असतानाच, कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री कोण असेल, याचेही कयास लावले जात आहेत. यानुसार, सध्या तरी केंद्रीय मंत्री प्रह्लाद जोशी आणि भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बीएल संतोष या दोघांची नावे सर्वात वर असल्याचे दिसते. जोशी हे उत्तर कर्नाटकातून खासदार आहेत आणि ते केंद्रातील मोदी मंत्रिमंडळातही आहेत. तसेच संतोष हे भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत.
का द्यावा लागू शकतो येदियुरप्पांना राजीनामा?कर्नाटकात भाजपचेच काही बंडखोर नेते मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. यामुळे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने अशा नेत्यांना इशाराही दिला आहे. मात्र, तरीही आरोप होतच आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येदियुरप्पा विरोधातील गट 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री बदलण्याची मागणी करत आहे. भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंह यांनी गेल्या महिन्यात राज्याचा दौरा करून नेत्यांच्या भेटीही घेतल्या होत्या.