बंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयानंतर आता राज्यातील मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा वाद अखेर मिटला. काँग्रेसकडूनमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावांची घोषणा झाली असून सिद्धरमैय्या हेच कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर, डीके शिवकुमार यांना सध्यातरी उपमुख्यमंत्रीपदाचीच खुर्ची सांभाळावी लागणार आहे. काँग्रेसच्या या घोषणेनंतर डीके शिवकुमार यांचे समर्थक नाराज झाले असून सिद्धरमैय्या यांच्या समर्थकांनी बंगळुरू येथे जल्लोष साजरा केला. दरम्यान, दोन्ही नेते काँग्रेसचे सचिव के.सी. वेणुगोपाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत.
पहिली दोन वर्षे सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करावे व त्यापुढील तीन वर्षे डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, असा फॉर्म्युला श्रेष्ठींनी तयार केला आहे. त्यासाठी काँग्रेस नेतृत्वावर विश्वास ठेवण्यास शिवकुमार तयार झाले आहेत. परंतु त्यांना भीती आहे की, सिद्धरामय्या दोन वर्षांनी मुख्यमंत्रिपद सोडतील की नाही? नंतर वाद उद्भवू नये, यासाठी हा फॉर्म्युला आताच जाहीर करावा, अशी अट शिवकुमार यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर ठेवली होती. मात्र, ही अट वरिष्ठांनी नाकारली आहे. यामुळे काँग्रेस श्रेष्ठी व मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा कमी होई, असे वेणुगोपाल यांनी म्हटले.
सिद्धरमैय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. त्यासाठी, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, वरिष्ठ पदाधिकारी, सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि गांधी कुटुंबीयांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे, आता या शपथविधी सोहळ्यासाठी महाविकास आघाडीतील कोणा-कोणत्या नेत्यांना निमंत्रित केले जाईल, याची चर्चा रंगणार आहे.