बंगळुरु : मी काँग्रेसच्या कृपेनं मुख्यमंत्री झालोय, असं विधान केल्यानं दोनच दिवसांपूर्वी चर्चेत आलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. राहुल गांधी हे पुण्यात्मा आहेत, असं कुमारस्वामी यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या कुमारस्वामी यांनी बुधवारी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसनं मला विश्वासानं सत्ता दिली आहे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत संवाद साधताना कुमारस्वामी यांनी राहुल गांधी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'आज माझ्याकडे जनतेचा आशीर्वाद नाही. मात्र पुण्यात्मा राहुल गांधींनी मोठ्या विश्वासानं माझ्याकडे सत्ता सोपवली आहे. आम्हाला एक चांगली संधी मिळाली असून आम्ही या संधीचा सदुपयोग करु,' असं कुमारस्वामी यांनी म्हटलं. बुधवारी कर्नाटकमधील शेतकरी संघटना कुमारस्वामी यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. त्यांच्याशी कुमारस्वामी यांनी संवाद साधला. तुमच्याकडे एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही याचा वापर करुन आमच्या पाठिशी उभे राहा, असं आवाहनही त्यांनी केलं. 'निवडणूक आल्यावर तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा. मात्र आताची परिस्थिती लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य करा,' असं कुमारस्वामी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला म्हणाले. भाजपा नेते येडियुरप्पा यांचं सरकार पडल्यावर जेडीएसचे नेते कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्ये काँग्रेसचे जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री आहेत.
कुमारस्वामी म्हणतात, राहुल गांधी म्हणजे पुण्यात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 11:03 AM