Karnataka New CM, Political Drama: कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी आणि बहुमताचा आकडा गाठून दिला. कर्नाटकमध्येकाँग्रेसला तब्बल 135 जागांवर विजय मिळाला. कर्नाटकातील धडाकेबाज विजयाला 100 तास उलटूनही मुख्यमंत्रीपदाचा पेच कायम आहे. मुख्यमंत्री कोणाला करायचे, सिद्धरामय्या की डीके शिवकुमार? हे अजून ठरलेले नाही. दिल्लीत बैठकांच्या वेगवान फेऱ्या सुरू आहेत. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी बुधवारी राहुल गांधी यांचीही भेट घेतली आहे. पण पेच सुटताना दिसत नाही.
काँग्रेस नेत्यांची स्मितहास्य असणारी अनेक फोटो प्रसिद्ध करण्यात आली आहेत. दोघांनी सोनिया गांधींशी फोनवर चर्चा केली. यानंतर बंगळुरूमध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झाली. सिद्धरामय्या यांचे नाव निश्चित झाले असून शिवकुमार उपमुख्यमंत्री होणार असल्याची बातमी हळूच कुठूनतरी पसरली. सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनीही जल्लोष केला, मिठाई वाटली. पण नंतर काँग्रेसचे सुरजेवाला म्हणाले- अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे समर्थक पुन्हा शांत झाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बंगल्यातून बाहेर आल्यानंतर पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सर्व अफवा आहेत. अद्याप कोणाचेही नाव निश्चित झालेले नाही. एक-दोन दिवसांत निर्णय होताच पक्ष स्वत: त्याची घोषणा करेल. भाजपला काँग्रेसच्या मुख्यमंत्री निवडीमध्ये रस असून अफवा पसरवण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोपही काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे माजी नेते सुधाकर के यांनी सिद्धरामय्या यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. 2019 मध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार पडल्यानंतरच्या गोष्टींबाबत हे आरोप करण्यात आलेत. सुधाकर म्हणाले की, त्यांनी सिद्धरामय्या यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी या सरकारशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले. तर डीके शिवकुमार यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली असता त्यांना उपमुख्यमंत्री पदासह ५ ते ७ खात्यांच्या मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय ते प्रदेशाध्यक्षपदीही राहणार आहेत.
कर्नाटकची टाइमलाइन-
13 मे : या दिवशी निकाल आले आणि काँग्रेसने बंपर विजय मिळवत 135 जागांवर पूर्ण बहुमत मिळवले.
14 मे: काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बंगळुरू येथे बैठक झाली, ज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे खर्गे ठरवतील असा एक ओळीचा ठराव मंजूर करण्यात आला.
15 मे : निरीक्षकांनी दिल्ली गाठून अहवाल खर्गे यांच्याकडे सोपवला. सिद्धरामय्या दिल्लीला पोहोचले पण शिवकुमार आले नाहीत.
16 मे : खर्गे यांच्या घरी राहुल गांधी यांची भेट. डीके शिवकुमार यांनी दिल्लीत येऊन खर्गे यांची भेट घेतली. यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची खर्गे यांच्यासोबत बैठक झाली.
17 मे : पाचव्या दिवशीही बैठकांचा सिलसिला सुरूच होता. सोनिया गांधी यांच्या घरी कर्नाटकच्या सीएमवर चर्चा झाली. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली मात्र मुख्यमंत्रीपदाचा निर्णय झाला नाही.
इतकं सारं होऊनही दिल्लीपासून बेंगळुरूपर्यंत हा गोंधळ सुरूच आहे. सिद्धरामय्या यांचे समर्थक बेंगळुरूमध्ये जल्लोष करत आहेत. त्यांनी सिद्धारामय्यांच्या पोस्टरवर दूध अर्पण केले. त्याचवेळी डीके शिवकुमार यांचे समर्थकही मागे राहिले नाहीत. त्यांनी डीकेंसाठी पूजा केली. डीके शिवकुमार यांनीही दिल्लीत त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेतली असून त्यात १२ आमदार उपस्थित होते.
डीके शिवकुमार यांची ताकद
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने संघटनेवर त्यांची हुकूमत आहे आणि ते पक्षाचा विश्वासार्ह चेहरा आहेत. बलाढ्य वोक्कलिगा समुदायाशी संबंधित आहे. 1989 पासून निवडणूक न हरण्याचा विक्रम. 2002 मध्ये महाराष्ट्रातील देशमुख सरकारला वाचवले. 2017 मध्ये अहमद पटेल यांचा राज्यसभा विजय निश्चित झाला. ते सर्वात श्रीमंत आमदार आहेत. त्यांची संपत्ती 1214 कोटी रुपये आहे.
सिद्धरामय्या यांची पॉवर
सिद्धरामय्या सोशल इंजिनीअरिंगमध्ये अधिक पॉवरफुल आहेत. सिद्धरामय्या यांच्या नाराजीमुळे काँग्रेसचे नुकसान होणार हे नक्की. ते कुरुबा समाजातील आहे. मुस्लिम मतदारांमध्येही त्यांची चांगली पकड आहे. सिद्धरामय्या यांची ही शेवटची निवडणूक होती. डीकेंच्या तुलनेत त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यांना डीके यांच्यापेक्षा जास्त राजकीय अनुभव आहे. यशस्वी प्रशासकाचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. सिद्धरामय्या यांचे जनसंपर्क आहे. त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.