बंगळुरू : लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोठा दावा केला आहे. भाजपा राज्यात ऑपरेशन लोटस सक्रिय करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाने काँग्रेस आमदारांना पक्ष बदलण्यासाठी ५० कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला. यावेळी कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तर सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारही पडेल,असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. याबाबत सिद्धरामय्या यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, "गेल्या एक वर्षापासून ते (भाजपा) आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आमच्या आमदारांना ५० कोटींची ऑफरही दिली होती. त्यांनी प्रयत्न केले पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत."
सिद्धरामय्या पुढे म्हणाले, "हे शक्य नाही. आमचे आमदार आम्हाला सोडणार नाहीत. एकही आमदार पक्ष सोडणार नाही." दरम्यान, सिद्धरामय्या यांनी आपल्या नेतृत्वाखाली काँग्रेस पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, सिद्धरामय्या यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपा खासदार एस प्रकाश म्हणाले की, समाजातील एका वर्गाची सहानुभूती मिळवण्यासाठी ते वारंवार असे आरोप करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
याचबरोबर, कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख मुद्दे आणि उपलब्धी यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुख्यमंत्री खोटे आरोप करत आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात २८ जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, सिद्धरामय्या केवळ निवडणुकीनंतर आपला पाय रोवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, असेही भाजपा खासदार एस प्रकाश म्हणाले.