Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र, राम मंदिरावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एका राम मंदिराचे लोकार्पण केले. काँग्रेस महात्मा गांधी यांच्या रामाची पूजा करते, तर भाजपवाले प्रभू श्रीरामांना सीता, लक्ष्मण आणि अंजनेय यांच्यापासून दूर नेत आहे, असा दावा सिद्धरामय्या यांनी केला.
रामावर राजकारण होता कामा नये. कारण श्रीरामचंद्र सर्वांचे आहेत. ते फक्त भाजपचा प्रभू नाहीत. प्रत्येक हिंदूचा देव आहे. आम्हीदेखील श्रीरामचंद्रांची पूजाही करतो. आम्हीही श्रीरामभक्त आहोत. आम्ही राम मंदिरही बांधले आहे. आम्ही श्रीरामचंद्रांच्या विरोधात नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले. मी माझ्या गावात श्रीरामचंद्र मंदिर बांधले. हे राजकीय कारणास्तव केलेले नाही. अयोध्येतील श्रीरामचंद्र हे संपूर्ण भारतातील गावांमध्ये असलेल्या श्रीरामचंद्रांपेक्षा वेगळे आहेत का, भाजप 'प्रभू रामाचे राजकारण करत आहेत, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. तसेच कालांतराने अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले. पत्रकारांशी ते बोलत होते.
आम्ही महात्मा गांधींच्या रामाची पूजा करतो
काँग्रेस महात्मा गांधींच्या रामाची पूजा करते, तर भाजप त्यांची पूजा करत नाही. भाजपा श्रीरामाला, सीता आणि लक्ष्मणापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. हनुमान, लक्ष्मण आणि सीतेशिवाय श्रीराम अपूर्ण आहेत. श्रीराम फक्त अयोध्येपुरते मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. आम्ही श्रीरामाच्या विरोधात आहोत, असे चित्र दाखवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पण, हे योग्य नाही, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर स्वामी गोविंददेव महाराज यांच्या हस्ते चरणामृत ग्रहण करत ११ दिवसांचे अनुष्ठान पूर्ण केले. पंतप्रधान मोदी यांनी मंदिर परिसरातील कुबेर टिळा येथील शिव मंदिरातही पूजा केली व जटायू मूर्तीचे अनावरण केले. त्यानंतर राम मंदिराच्या निर्माण कार्यात सहभागी श्रमिकांवर पुष्पवर्षाव केला.