मैसूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 साली लोकसभेची निवडणूक दोन मतदारसंघातून लढवण्याची काय गरज होती, असा सवाल काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विचारला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या चामराजनगर येथील सभेत सिद्धरामय्या यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वत:साठी 2+1 असे सूत्र करण्यात आले आहे. त्यानुसार सिद्धरामय्या यांच्यासाठी दोन तर त्यांच्या मुलासाठी एका मतदारसंघाची तजवीज केली जाते. या टीकेला प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या यांनी मोदींवर पलटवार केला. मी दोन मतदारसंघातून निवडणूक लढत असल्यामुळे मोदी माझ्यावर टीका करतात. परंतु, 2014 मध्ये नरेंद्र मोदींनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना हरण्याची भीती वाटत होती का, असा सवाल सिद्धरामय्या यांनी विचारला. तसेच त्यांनी गरिबीच्या मुद्द्यावरूनही मोदींना लक्ष्य केले. तुमच्याकडे गरिबांचा आवाज ऐकणारे मनच नसेल तर नुसती 56 इंचांची छाती असून उपयोग नसतो, अशी टीकाही सिद्धरामय्या यांनी केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकातील विद्यमान सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. संसदेत १५ मिनिटे बोलण्याची मुभा द्या, पंतप्रधान मोदींचे तोंड बंद करू, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावर कागदाचा एकही तुकडा न घेता, इंग्रजी, हिंदी अथवा तुमच्या मातृभाषेत फक्त १५ मिनिटे भाषण करून दाखवा, १५ मिनिटेच राज्य सरकारच्या कामाबाबत माहिती द्या, असे खुले आव्हानच मोदी यांनी राहुल गांधींना दिले होते.
गरिबांचा आवाज ऐकणारे ह्रदय नसेल तर 56 इंचांची छाती असून उपयोग नाही- सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 2:30 PM