बंगळुरू: कर्नाटक विधानसभेच्या मतदानानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. कालच एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या समीकरणांनुसार तयारीला सुरुवात झाली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. वेळ पडल्यास दलित व्यक्तीसाठी मी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. टीव्ही 9 कन्नड या स्थानिक वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले आहे. सिद्धरमय्या यांनी मुलाखतीत म्हटले की, जर कोणा दलित व्यक्तीला मुख्यमंत्रीपद देण्याची गरज पडली तर मी स्वतः मुख्यमंत्रीपदावरून दूर होईन. तत्पूर्वी सिद्धरामय्या यांनी मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपा सर्वांत मोठा पक्ष राहील हे भाकित फेटाळून लावले. काँग्रेसच स्पष्ट बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल, या चाचण्यांच्या निष्कर्षांना त्यांनी मनोरंजक बातम्या म्हटले. मतदानोत्तर चाचण्यांचा पुढील दोन दिवसांत मनोरंजनाचे साधन आहे. एक्झिट पोल हे त्या व्यक्तीसारखे आहेत ज्यांना पोहता येत नाही. मात्र, त्याला या गोष्टींचा दिलासा आहे की, तो यात बुडणार नाही. कारण त्याला नदीची खोली केवळ चार फुट सांगून भ्रमित करण्यात आहे, असे सांगत त्यांनी मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल मानण्यास सपशेल नकार दिला. तर दुसरीकडे मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालांनुसार किंगमेकर ठरणार असलेल्या जनता दलाने (सेक्युलर) सावध भूमिका घेतली आहे. 'सध्या कोणतीही ऑफर स्वीकारण्याची किंवा नाकारण्याच्या स्थितीत नाही. 15 मे रोजी मतमोजणी सुरू झाल्यावर काय होतं ते पाहू,' असं देवेगौडा यांनी सांगितले.
दलित व्यक्तीसाठी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार- सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 5:22 PM