“धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करुन भाजपाने १४० कोटी जनतेचा अपमान केला”: सिद्धरामय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 03:27 PM2024-01-11T15:27:11+5:302024-01-11T15:28:58+5:30
Ayodhya Ram Mandir: PM मोदींकडे लोकसभा निवडणुका कामगिरीच्या जोरावर लढवण्याचा आत्मविश्वास नाही. त्यामुळे भाजपाने घाईने राम मंदिर सोहळा आयोजित केला, अशी टीका करण्यात आली आहे.
Ayodhya Ram Mandir: २२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या राम मंदिर लोकार्पणाच्या भव्य सोहळ्यावरून देशातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत काँग्रेसने या सोहळ्याला जाणार नसल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपा नेते काँग्रेसवर हल्लाबोल करताना दिसत असून, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि अधीर रंजन चौधरी हे राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण 'आदरपूर्वक नाकारत' आहे. भाजपा आणि RSS निवडणूक फायद्यासाठी याचा वापर करत आहेत. हा एक राजकीय कार्यक्रम बनविण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. सर्व हिंदूंचा विश्वासघात केला जात आहे. राममंदिर प्राणप्रतिष्ठा हा धार्मिक कार्यक्रम असून तो भक्तिभावाने आयोजित करायला हवा होता, पण त्याचे राजकीय प्रचारात रूपांतर झाले आहे, या शब्दांत सिद्धरामय्या यांनी हल्लाबोल केला.
या निर्णयाला माझा पाठिंबा आहे
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी या सर्वांनी रामलल्लाच्या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला माझा पाठिंबा आहे. एका धार्मिक कार्यक्रमाचे राजकारण करून १४० कोटी भारतीयांचा अपमान करण्यात आला आहे. हा सर्व हिंदूंचा विश्वासघात आहे. हा एक धार्मिक कार्यक्रम असून तो भक्तिभावाने आयोजित करायला हवा होता, पण त्याचे राजकीय प्रचारात रूपांतर केले जात आहे. रामजन्मभूमी वादाच्या पहिल्या दिवसापासून काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींना देशाची सत्ता हाती घेऊन १० वर्षे झाली, पण मतदारांसमोर आपण केलेल्या कामगिरीच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा घाईघाईने हा कार्यक्रम आयोजित करत आहे. भाजपा आणि संघाचे राजकारण जनतेला कळत आहे. ते त्यांच्या फंदात पडणार नाहीत. राम मंदिराच्या उभारणीसाठी घेतलेल्या देणगीचा हिशेब जनतेकडून मागितला जात आहे. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, नारायण गुरू यांसारख्या महान व्यक्तींनी जो हिंदू धर्म पाळला त्याबद्दल आम्हाला कोणतीही अडचण नाही. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भाजपच्या दांभिक हिंदुत्वाची आम्हाला अडचण आहे, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.