सिद्धरामय्या मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदाची आज घेणार शपथ; विरोधकांची एकजूट दाखवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 08:26 AM2023-05-20T08:26:41+5:302023-05-20T08:27:29+5:30
शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसने अनेक समविचारी पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.
कर्नाटकातकाँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले, गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला मुख्यमंत्रीपदाचा गुंता अखेर सुटला. मुख्यमंत्रीपदाची सिद्धरामय्या तर उपमुख्यमंत्रीपदाची डीके शिवकुमार शपथ घेणार आहेत. आज हा शपथविधी होणार आहे. मंत्रिमंडळात सामील होणारे काही आमदारही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या अगोदर, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार नवीन मंत्रिमंडळात समावेश केलेल्या मंत्र्यांची नावे आणि खात्यांच्या वितरणाबाबत हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत.
सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचीही भेट घेतली. काँग्रेसने आपल्या अधिकृत हँडलवरून या बैठकीचे फोटो ट्विट केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "कर्नाटकमधील लोकांच्या सरकारच्या शपथविधीपूर्वी एक बैठक." यावेळी सिद्धरामय्या यांनी दिल्लीत काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.
अलविदा २०००! २ हजारांची नोट वितरणातून मागे; आरबीआयचा मोठा निर्णय, सांगितलं महत्वाचं कारण
या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसकडून विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीला अद्याप जवळपास एक वर्ष बाकी असल्याने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या एकजुटीचे प्रदर्शन म्हणून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याकडे पाहिले जात आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या श्री कांतीराव स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. या स्टेडियममध्ये सिद्धरामय्या यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत दुपारी १२:३० वाजता कांतेराव स्टेडियमवर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर सिद्धरामय्या २०१३ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दुसरीकडे, ६१ वर्षीय शिवकुमार, जे यापूर्वी सिद्धरामय्या यांच्या सरकारमध्ये मंत्री होते, ते पुढील वर्षी होणाऱ्या संसदीय निवडणुकीपर्यंत कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील.
काँग्रेसने गुरुवारी १८ मे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवकुमार यांना एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. त्यानंतर गुरुवारीच झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांची औपचारिकपणे नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी राज्यपालांकडे दावा केला, ज्यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले.
सिद्धरामय्यांसमोरील पहिले आव्हानात्मक काम म्हणजे सर्व समुदाय, प्रदेश, गटांचे प्रतिनिधी आणि जुन्या व नव्या पिढीतील आमदार यांच्यातील समतोल साधून योग्य संयोजनासह मंत्रिमंडळ तयार करणे. कर्नाटक मंत्रिमंडळाचे मंजूर संख्याबळ ३४ आहे, तर मंत्रिपदाच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, अनेक मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.