“सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 02:56 PM2024-01-02T14:56:47+5:302024-01-02T14:56:56+5:30

Siddaramaiah News: अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. तिथे जाऊन दर्शन घेण्याची गरज काय आहे, असे विधान करत काँग्रेस नेत्याने भाजपवर सडकून टीका केली.

karnataka congress leader h anjaneya compare siddaramaiah with lord rama and criticised bjp | “सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

“सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?”; काँग्रेस नेत्याचे विधान

Siddaramaiah News: आताच्या घडीला देशभरात राम मंदिराचीच चर्चा जोरदार सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुका आणि राम मंदिर हेच दोन विषय राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चिले जात आहेत. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून सुमारे ७ ते ८ हजार मान्यवर या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, विरोधकांकडून या सोहळ्याला कोण जाणार, जायचे की नाही, याबाबत संभ्रम असल्याचे दिसत आहे. आमच्यासाठी सिद्धरामय्या हेच राम असून, अयोध्येला जायची गरज काय, असे विधान एका काँग्रेस नेत्याने केले आहे. 

अयोध्येत सध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच राम मंदिराच्या लोकार्पणाचा घाट घातला जात असल्याची टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर केली जात आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांमध्ये एकवाक्यता नसून, संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच आता कर्नाटकमधील काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते एच. अंजनेय यांनी केलेले एक विधान चर्चेचा मुद्दा बनले आहे. 

सिद्धरामय्याच आमच्यासाठी राम, मग अयोध्येला जाण्याची गरज काय?

सिद्धरामय्या राम मंदिराच्या सोहळ्याला जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजनेय म्हणाले की, सिद्धरामय्या हे स्वत:च राम आहेत. सिद्धरामय्या आमच्यासाठीही राम आहेत. अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेण्याची काय गरज आहे? अयोध्येमध्ये भाजपाचे राम आहेत. सिद्धरामय्यांच्या गावात रामाचे मंदिर आहे. तिथे जाऊन ते रामाचे दर्शन घेतील. भाजपाकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा जाणून बुजून तापवला जात आहे. राम सर्वत्र आहेत. राम आपल्या हृदयात आहेत. माझे नाव अंजनेय आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामायणात अंजनेयाने काय केले होते, असे एच. अंजनेय यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, धर्माच्या आधारावर फोडा आणि राज्य करा अशीच भाजपाची नीती राहिली आहे. भाजपाला असे वाटतेय की जर त्यांनी एका धर्मावर सातत्याने हल्ले केले तर इतर धर्माचे लोक त्यांना मत देतील. आम्हीही हिंदू आहोत. त्यांनी काही हिंदू धर्म किंवा हिंदू लोकांना विकत घेतलेले नाही. आजही काही दलित लोक अशा ठिकाणी राहतात जी जागा राहण्यासाठीही योग्य नाही. या लोकांसाठी घरे बांधून त्यांना तिथे हलवायला हवे. या घरांना राम मंदिर म्हणा. मग खरे राम तुम्हाला आशीर्वाद देतील. रामाचा वापर मतांच्या राजकारणासाठी करू नका, या शब्दांत एच. अंजनेय यांनी हल्लाबोल केला.
 

Web Title: karnataka congress leader h anjaneya compare siddaramaiah with lord rama and criticised bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.