"माझा स्वाभिमान दुखावला तर राजीनामा देईन", कर्नाटकात काँग्रेस आमदार बीआर पाटील यांनी का दिली धमकी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 06:40 PM2023-07-31T18:40:03+5:302023-07-31T18:41:19+5:30
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्याबद्दल माफी मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कलबुर्गी : कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. पण, आतापासूनच बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. कर्नाटकमधील आमदार बी. आर. पाटील यांनी बंडखोर वृत्ती दाखवत राजीनामा देण्याची धमकी दिली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत बी. आर. पाटील यांनी 'स्वाभिमाना'चा हवाला देत राजीनामा देण्याचे भाष्य केले होते. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या समस्या मांडल्याबद्दल माफी मागितली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. येथे आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली होती. जवळपास ३० आमदारांनी सिद्धरामय्या आणि पक्षनेतृत्वाला पत्र लिहून आपल्या मतदारसंघात विकासकामे न झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. आमदार बी. आर. पाटील म्हणाले की, काही मंत्र्यांच्या वागणुकीमुळे काही आमदार नाराज झाले आहेत. यात सुधारणा न झाल्यास आपला लढा सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. तसेच, गुरुवारी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीबद्दल आणि तिथे काय घडले याबद्दल समाधानी असल्याचेही बी. आर. पाटील यांनी सांगितले.
याबाबत विचारले असता गृहमंत्री जी. परमेश्वरा यांच्यासह काही मंत्र्यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणाऱ्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत माफी मागितली होती. दरम्यान, बी. आर. पाटील म्हणाले, "मी मीडिया आणि वृत्तपत्रांचे वृत्तही पाहिले आहे. कोणी माफी मागितली हे मला माहीत नाही. मी माफी मागितलेली नाही आणि माफीही मागणार नाही. आम्ही माफी मागावी असा आम्ही काही गुन्हा केला आहे की आमच्याकडून मोठी चूक झाली आहे." याचबरोबर, राजीनामा देणार असल्याचे बैठकीत सांगितले होते का? असे विचारले असता, "माझा स्वाभिमान दुखावला असेल तर मी राजीनामा देईन आणि जाईन, असे मी एका क्षणी सांगितले होते, असेही बी. आर. पाटील यांनी सांगितले.
का नाराज आहेत आमदार?
दोन डझनहून अधिक आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी न देणे हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नाराजीवर आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विधान आले होते, ज्यात त्यांनी आमदारांना सांगितले होते की, पाच हमीभाव पूर्ण करण्यात सरकारचा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल.