“श्रीराम आमचे कुलदैवत, मी परम रामभक्त”; काँग्रेस नेते इक्बाल हुसैन यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 10:51 AM2024-01-06T10:51:27+5:302024-01-06T10:51:41+5:30
Congress Mla Iqbal Hussain: भाजप राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांचा गैरफायदा घेते, अशी टीका इक्बाल हुसैन यांनी केली.
Congress Mla Iqbal Hussain: २२ जानेवारी २०२४ ला होणाऱ्या रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून, अनेक गोष्टी अंतिम टप्प्यात आल्यात आहेत. या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ७ ते ८ हजार मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवले असले तरी जायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, यातच काँग्रेसचे कर्नाटकातील नेते आणि आमदार एचए इक्बाल हुसैन यांनी एक मोठे विधान केले आहे. श्रीराम आमचे कुलदैवत आहे. मी श्रीरामांचा परम भक्त आहे, असे हुसैन यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे आमदार एचए इक्बाल हुसैन यांनी भगवान रामावर विश्वास व्यक्त केला आहे. राम हे आमचे कुलदैवत असून सरस्वती, लक्ष्मी, गणेश, राम यासह विविध देवतांची आम्ही लहानपणापासून पूजा करत आहोत, असे इक्बाल हुसैन यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना इक्बाल हुसैन म्हणाले की, मी रामभक्त आहे आणि मला त्याबद्दल दुसरे काही वाटत नाही. राम हे आमचे कुलदैवत आहे आणि मी त्यांचा सर्वांत मोठा भक्त आहे. आमच्याकडे रामपूजेसाठी विशेष कक्ष आहे, असे इक्बाल हुसैन यांनी म्हटले आहे.
भाजप राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांचा फायदा घेते
इक्बाल हुसैन यांनी भाजपवर निशाणा साधला. इक्बाल हुसैन म्हणाले की, भाजप राजकीय फायद्यासाठी धार्मिक भावनांचा फायदा घेते. काँग्रेस पक्ष एकतेवर केंद्रित असलेली विचारधारा कायम ठेवतो आणि लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी धर्माचा वापर करत नाही. सर्व राजकीय पक्षांचा सहभाग असलेला ‘रामोत्सव’ भव्य पण धर्मनिरपेक्ष पद्धतीने साजरा करण्याचे मी ठरवले आहे, असे हुसैन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सीपीआयएमच्या नेत्यांनी निमंत्रण मिळूनही कार्यक्रमाला येण्यास नकार दिला आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देवांनी बोलावल्यावर जाऊ, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, अद्याप निमंत्रण दिलेले नाही.