Karnataka: चक्क बैलगाडीवरून विधानसभेत पोहोचले काँग्रेस आमदार, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 06:38 PM2023-05-22T18:38:18+5:302023-05-22T18:40:04+5:30
Congress MLA In Karnataka: मांड्या विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेले रवि गनिगा बैलगाडीने विधान भवनात पोहोचले. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कर्नाटकमध्ये भाजपाचा दारुण पराभव केल्यानंतर सिद्धारमैय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सरकार स्थापन केले आहे. हे सरकार स्थापन झाल्यानंतर सोळाव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. यादरम्यान सर्व नवनिर्वाचित आमदार विधान भवनात दाखल झाले. यादरम्यान एका आमदारानं सर्वांची नजर खिळली होती. ते आमदार होते काँग्रेसचे रवि गनिगा. रवि गनिगा हे जरा हटके पद्धतीने विधान भवनात दाखल झाले. मांड्या विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेले रवि गनिगा बैलगाडीने विधान भवनात पोहोचले. आता या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
विधानसभा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या तीन दिवसीय अधिवेशनादरम्यान सर्व नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार आहेत. या दरम्यान नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडही होणार आहे. सध्या प्रोटेम स्पीकर म्हणून सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आर. व्ही. देशपांडे हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देत आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मंत्री जी. परमेश्वर, के. एच मुनियप्पा, एम. बी. पाटील, के. जे जॉर्ज, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.
#WATCH | Bengaluru, Karnataka: Ravi Ganiga, Congress MLA of Mandya constituency arrives at Vidhana Soudha in a bullock cart pic.twitter.com/yv3xQqaEr3
— ANI (@ANI) May 22, 2023
अधिवेशनाच्या सुरुवातीला देशपांडे यांनी सांगितले की, आम्ही सर्व जण कर्नाटकमधील जनतेच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो आहोत. येथे काही ज्येष्ठ नेते आहेत. तर काही नवे चेहरे देखील आहेत. आपण सर्वांनी मिळून कर्नाटकाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान झाले होते. तर १३ मे रोजी मतमोजणी झाली होती. त्यात काँग्रेसने बाजी मारत भाजपाचा दारुण पराभव केला होता. काँग्रेसला १३५ हून अधिक जागा मिळाल्या होत्या.