कर्नाटकातकाँग्रेसचे सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले आहेत. पण, आतापासूनच बंडखोरीच्या बातम्या येत आहेत. यापूर्वीच आमदारांकडून मंत्री आणि निधीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. येथे आमदारांनी उघडपणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत प्रत्येकाला तक्रार थेट करण्याचा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार बीआर पाटील यांच्या नावाचे एक कथित पत्र व्हायरल झाले होते. यामध्ये त्यांनी सरकारच्या मंत्र्यांबद्दल उघड नाराजी दर्शवली आहे. चर्चेविना अधिकाऱ्यांच्या बदल्या, विकासासाठी निधीचे वाटप न होणे आदी मुद्दे आमदारांनी उपस्थित केले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतही हाच मुख्य विषय असल्याचे सांगितले जात आहे.
का नाराज आहेत आमदार?दोन डझनहून अधिक आमदारांनी आपल्या मतदारसंघासाठी निधी न देणे हा मुख्य मुद्दा असल्याचे सांगत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नाराजीवर आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विधान आले होते, ज्यात त्यांनी आमदारांना सांगितले होते की, पाच हमीभाव पूर्ण करण्यात सरकारचा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे त्यांना प्रतीक्षा करावी लागेल.
सरकार पाडण्याचे षडयंत्र - डीके शिवकुमारदरम्यान, आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी पक्षात नाराजी नसल्याचे सांगितले आहे. आमदारांनी केवळ आपल्या मतदारसंघातील समस्यांकडे लक्ष वेधले. यामुळेच विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावून आता सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, डीके शिवकुमार यांच्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे. सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे, परंतु हे षडयंत्र बंगळुरूऐवजी सिंगापूरमधून घडत आहे, असा आरोप डीके शिवकुमार यांनी केला आहे. मात्र, डीके शिवकुमार यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही.
बंडखोरीच्या बातम्या समोर येतायेतकर्नाटकमध्ये दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका झाल्या. यानंतर राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. कर्नाटकात काँग्रेसचे १३५ आमदार आहेत तर भाजपचे ६६ आमदार आहेत. काँग्रेससाठी सरकार स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री निवडण्याचे आव्हान होते, कारण तेव्हा सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात रस्सीखेच सुरू होती. आता सरकार स्थापन होऊन अवघे दोन महिने झाले असतानाच बंडखोरीच्या बातम्या समोर येत आहेत.