RSS संस्थापकांचा धडा अभ्याक्रमातून वगळणार? काँग्रेस मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 02:59 PM2023-06-09T14:59:04+5:302023-06-09T14:59:42+5:30
कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर काँग्रेस भाजप सरकारने अभ्यासक्रमात आणलेले काही धडे काढणार असल्याची चर्चा आहे.
Karnataka Congress: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्यावरुन आता कर्नाटकात काँग्रेस-भाजपमध्ये वाद सुरू झाला आहे. सत्तेत येताच काँग्रेसने भाजप सरकारने शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलेला हेडगेवार यांच्यावरील धडा काढण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे मंत्री दिनेश गुंडू राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
#WATCH | "We should have stories about people who have really contributed to the building of the nation. If you talk about the freedom struggle, those who participated in the freedom struggle - history should reflect that, not your personal choices, not who you idolise. BJP has… pic.twitter.com/tjGEhYv418
— ANI (@ANI) June 9, 2023
कर्नाटकचे मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले की, आमचे सरकार मागील भाजप सरकारने पाठ्यपुस्तकांमध्ये आणलेले काही धडे काढून टाकण्याचा विचार करत आहे. अशा लोकांच्या कथा आपल्याकडे असायला हव्यात, ज्यांनी देशाच्या उभारणीत खरे योगदान दिले आहे. जेव्हा स्वातंत्र्यलढ्याचा प्रश्न येतो, तेव्हा इतिहासाने अशा लोकांची नावे लक्षात ठेवली पाहिजेत, ज्यांनी त्यात प्रत्यक्ष भाग घेतला होता. भाजपने मुलांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपले वैचारिक मुद्दे घालण्याचा प्रयत्न केला, जे योग्य नाही. काँग्रेसने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुधारात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
अनावश्यक सामग्री काढून टाकली जाईल
राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मुध बंगारप्पा यांनी सांगितले की, शालेय अभ्यासक्रमाचा आढावा घेऊन आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक आहे तेच अभ्यासक्रमात ठेवले जाईल. अनावश्यक गोष्टी अभ्यासक्रमातून काढून टाकल्या जातील.
काँग्रेस आमदाराची जहरी टीका
कर्नाटकममधील विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार बीके हरिप्रसाद यांनी हेडगेवार यांना भ्याड आणि बनावट स्वातंत्र्यसैनिक म्हटले. यासोबतच त्यांनी शालेय अभ्याक्रमातून हेडगेवार यांचा आयुष्यावरील धडा वगळण्यावर भर दिला. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यसैनिक असल्याचा कोणताही पुरावा नाही. भ्याड आणि बनावट स्वातंत्र्यसैनिकांच्या आयुष्यावर आधारित धडे आम्ही मुलांच्या अभ्यासक्रमात कधीही सामील करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.