नवी दिल्ली : कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील कॉंग्रेस सरकारने राज्यात शक्ती योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. मात्र, या योजनेवरून सोशल मीडियावर एक भलतीच चर्चा रंगली आहे. काही लोक या योजनेची स्तुती करत आहेत, तर काहींनी टीका देखील केली आहे. काँग्रेसच्यामहिला नेत्या लावण्य बल्लाळ जैन यांनी 'झिरो बस' तिकीट असलेला एक फोटो पोस्ट केला, ज्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?खरं तर कॉंग्रेस नेत्या जैन यांना ट्रोल करताना अनेक नेटकऱ्यांनी म्हटले की, लावण्य यांच्याकडे दागिने आणि मेकअपसाठी पैसे आहेत पण बसच्या भाड्यासाठी नाही. यानंतर लावण्य यांनी या प्रकरणावरून टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "ठीक आहे, माझी लिपस्टिक पाहून अनेक पुरूषांना त्रास झाला असेल पण त्यामुळेच शक्ती योजनेला अधिक प्रसिद्धी मिळाली आहे. हल्ली जेव्हा जेव्हा ते मला लिपस्टिकमध्ये पाहतात तेव्हा ते चर्चा करत असतात. मी स्वतःला कसे प्रेझेंट करावे हे ते ठरवू शकतात. पण, मला एक स्त्री म्हणून हे आवडते, मला चांगले कपडे आणि मेकअप आवडतो."
कर्नाटकात शक्ती योजना लागू झाल्यानंतर काँग्रेस नेत्या लावण्य बल्लाळ जैन यांनी मोफत बस तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल केले आणि म्हटले की, तुमच्याकडे मेकअप आणि दागिन्यांसाठी पैसे आहेत, पण बस भाड्यासाठी नाही. सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर कॉंग्रेस नेत्या जैन यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.