कर्नाटकच्या सिरसी तालुक्यातील हिपानाहल्ली परिसरात एक अनोखी घटना घडली आहे. याठिकाणी एका व्यक्तीची २० ग्रॅम सोन्याची चेन गायीनं गिळली. सुरुवातीला महिनाभर या व्यक्तीने गायीच्या शेणावर नजर ठेवली. परंतु जेव्हा ही चेन सापडलीच नाही तेव्हा त्या व्यक्तीने गायीला घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांनी गायीची तपासणी केली तेव्हा ही चेन गायीच्या पोटात असल्याचं दिसून आले.
रिपोर्टनुसार, श्रीकांत हेगडे यांच्याकडे गाय आणि वासरु आहे. दिवाळीच्या निमित्ताने हेगडे कुटुंबाने गौ-पूजा केली. त्यासाठी गायीला आणि वासराला आंघोळ घालून त्यांना फुलांनी सजवण्यात आले. काही जण गायीला लक्ष्मीचं रुप मानतात. त्यामुळे गायीला मौल्यवान दागिन्यांनी नटवलं जाते. पूजा झाल्यानंतर हे सर्व दागिने काढले जातात. श्रीकांत हेगडे यांच्या कुटुंबाने गाईला २० ग्रॅम सोन्याची साखळी घातली होती. परंतु सोनसाखळी काढताना फुलांच्या अन्य सामानासोबत ते गायीच्या समोर ठेवण्यात आले.
त्यानंतर गायीच्या गळ्यातील सोनसाखळी गायब झाल्याचं आढळलं. ही चेन शोधण्याचा खूप प्रयत्न झाला. त्यानंतर घरच्यांनी अंदाज लावला की, ही चेन फुलांसोबत गाईनं गिळली असावी. जवळपास ३० ते ३५ दिवस कुटुंबातील लोक गायीच्या शेणाकडे लक्ष देत होते. कदाचित ही चेन सापडेल अशी आशा त्यांना होती. परंतु काहीच हाती न लागल्याने निराशा पसरली. अखेर मदतीसाठी त्यांनी पशु वैद्यकीय दवाखाना गाठला. याठिकाणी मेटल डिटेक्टरच्या मदतीनं गायीची तपासणी केली. तेव्हा तिच्या पोटात धातू असल्याचं दिसून आले. त्यानंतर गायीचं पोट स्कॅन करुन ही चेन कुठे अडकली आहे याचा शोध घेतला.
कुटुंबाच्या परवानगी गायीची सर्जरी करण्यात आली. त्यानंतर ही चेन बाहेर काढली. परंतु सोनसाखळीचं वजन २० ग्रॅमहून १८ ग्रॅम झालं होतं. या सोन्याच्या साखळीचा छोटा भाग गायब झाला होता. परंतु चेन परत मिळाली त्यामुळे कुटुंबाने आनंद व्यक्त केला. पण त्याचसोबत कुटुंबातील लोकांच्या चुकीमुळे गायीला या अडचणीतून जावं लागलं याचीही खंत साऱ्यांनी व्यक्त केली.