बंगळुरु: स्थापनेपासून अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात असलेलं सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. बंडखोर आमदारांची समजूत काढण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू आहेत. काँग्रेसचे संकटमोचक मानले जाणारे डी. के. शिवकुमार यांनी बांधकाम मंत्री एम. टी. बी नागराज यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. याशिवाय इतर आमदारांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहेत.काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि जल संसाधन मंत्री डी. के. शिवकुमार आज पहाटे 5 वाजता नागराज यांच्या घरी पोहोचले. त्यांनी जवळपास पाच तास त्यांच्याशी बातचीत केली. शिवकुमार यांनी नागराज यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. या बैठकीनंतर नागराज काँग्रेससोबतच राहणार असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली. तर दुसरीकडे रामलिंग रेड्डी, मुणीरत्ना आणि आर. रोशन बेग यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी राजीनामा द्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता शिवकुमार आणि इतर काँग्रेस नेत्यांनी मला राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला, असं नागराज यांनी सांगितलं. चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यावर आता सोबतच राहायला हवं आणि सोबतच मरायला हवं, असं शिवकुमार म्हणाले. प्रत्येक कुटुंबात चढ-उतार येतात. आपण सगळं विसरुन पुढे जायला हवं. नागराज यांनी सोबत राहण्याचं आश्वासन दिलेलं आहे, अशी माहिती शिवकुमार यांनी दिली.