मुंबई – कर्नाटकमधील राजकीय वादंग थांबण्याचं नाव घेत नाहीये. कुमारस्वामी यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसने ब्रह्मास्त्र बाहेर काढले आहे. राजकीय चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले डी.के. शिवकुमार कर्नाटक सरकार वाचविण्यासाठी धावून आले आहे. काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार मुंबईत दाखल झाले आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रणनिती भेदणारा नेता काँग्रेसकडेही असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, शिवकुमार यांना समोर येण्यासाठी बराच कालावधी लागला आहे.
काँग्रेसने भाजपची योजना हाणून पाडण्यासाठी शिवकुमार यांना पाचारण केले आहे. शह आणि काटशह देण्यासाठी शिवकुमार निष्णांत आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर आमदारांना भेटण्यासाठी प्रवेश मिळणार नाही हे समजल्यानंतर शिवकुमार यांनी हॉटेलच्या गेटवरच ठिय्या दिला. शिवकुमार यांना विश्वास आहे की, उशिरा का होईना, आमदार त्यांना भेटण्यासाठी राजी होईल. त्यामुळे मुंबईतील पावसात शिवकुमार छत्री घेऊन गेटवर उभे ठाकले आहेत.
कर्नाटकमधील सरकार वाचविण्यासाठी शिवकुमार यांनी दुसऱ्यांदा पुढाकार घेतला आहे. कोट्यधीश असलेले शिवकुमार यांनी याआधी कर्नाटक सरकार स्थापन करताना महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. पक्षाला कोणत्याही संकटातून काढण्याची आणि वेळप्रसंगी पक्षासाठी निधी गोळा करण्यात शिवकुमार यांचा हातखंडा आहे. ते सिद्धरमय्या सरकारमध्ये शिवकुमार हे उर्जामंत्री होते.
याआधी कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करताना आमदार फुटण्याची भिती होती. त्यावेळी शिवकुमार यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना बंगळुरूच्या बाहेर हलविले होते. तसेच विधानसभेत आणताना चोख बंदोबस्त केला होता. त्यावेळी शिवकुमार यांनी एकही आमदार फुटू दिला नव्हता. या व्यतिरिक्त सोनिया गांधी यांचे विश्वासू अहमद पटेल यांची गुजरातमधून राज्यसभा निवडणुकीत पराभवाची शक्यता होती. त्यावेळी काँग्रेसचे आमदार फुटण्याची शक्यता होती. मात्र शिवकुमार यादव यांनी सर्व आमदारांना आपल्या रिसॉर्टमध्ये हलवून अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग सुकर केला होता.
शिवकुमार यांचे महाराष्ट्र कनेक्शन
शिवकुमार यांनी २००२ मध्ये महाराष्ट्रात विलासराव देशमुख यांचे सरकार वाचविण्यासाठी मोठी खेळी केली होती. विलासराव देशमुख यांना विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी शिवकुमार यांनी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईहून बंगळुरूला नेले होते. त्यामुळे सर्व आमदार एकत्र ठेवण्यास काँग्रेसला यश आले होते. एकूणच भाजपच्या अमित शाह यांच्या राजकीय डावपेचांना शह देण्याची क्षमता असलेला नेता काँग्रेसकडे देखील आहे. परंतु, शिवकुमार यांना म्हणावी तशी संधी अद्याप मिळाली नाही.
शिवकुमार यांच्या अलिशान रिसॉर्टची काँग्रेसला मदतच
शिवकुमार हे कर्नाटकमधील दुसरे सर्वात श्रीमंत नेते आहेत. २०१३ मधील निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवकुमार यांची संपत्ती २५० कोटी रुपये एवढी नमूद करण्यात आली होती. आता त्यांची संपत्ती ६०० कोटींवर गेली आहे. त्यांच्याकडे अलिशान रिसॉर्ट आहेत. त्या रिसॉर्टच्या मदतीने शिवकुमार काँग्रेसची मदत करतात. गुजरातमधील काँग्रेस आमदार फुटत असताना शिवकुमार यांनी ४४ आमदारांना त्यांच्या रिसॉर्टमध्ये ठेवले होते.