Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: रामभक्तांचे पाचशे वर्षांचे स्वप्न साकार झाले. या सुवर्णक्षणाची भारतासह अवघे जग उत्सुकतेने वाट पाहत होते. रामललांच्या मूर्तीची अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली आणि संपूर्ण देशभरात जय श्रीरामचा जयघोष गुंजला. काँग्रेससह अन्य पक्ष राम मंदिर सोहळ्यापासून अलिप्त राहिले. राम मंदिर सोहळ्यावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी भाजपावर टीका केली आहे. सिद्धरामय्या यांच्या नावात राम आहे आणि माझ्या नावात शिव आहे. त्यामुळे कुणी आम्हाला धर्म शिकवू नये, असे डीके शिवकुमार यांनी स्पष्टपणे सांगितले.
राम मंदिर सोहळ्यानिमित्त देशात अनेक ठिकाणी सुटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक सरकारने सुटी जाहीर केली नाही. यावरून भाजपाने टीका केली होती. या टीकेला डीके शिवकुमार यांनी उत्तर दिले. आम्ही आमच्या श्रद्धा आणि धर्माचा आदर करतो. आम्ही त्याची प्रसिद्धी, दिखाऊपणा करणार नाही. आम्हाला कोणी विचारले नाही, पण आमचे मंत्री मंदिरात पूजा करतात. आमच्या प्रार्थना फळ नक्कीच मिळेल, असे डीके शिवकुमार म्हणाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावात राम आहे, माझ्या नावात शिव आहे. कोणीही आपल्याला धार्मिकता शिकवण्याची किंवा दबाव आणण्याची गरज नाही. आम्ही आमचे कर्तव्य करू, असे डीके शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही
राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपाने त्यांचेच नेते निवडले. देशात अनेक नेते आणि मुख्यमंत्री आहेत. राम मंदिर कुणाची खाजगी मालमत्ता नाही. प्रत्येक धर्मावर आणि त्याच्या प्रतिकांवर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा अधिकार नाही, अशी टीका डीके शिवकुमार यांनी केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही भाजपावर टीका केली. आम्हीदेखील श्रीरामचंद्रांची पूजाही करतो. आम्हीही श्रीरामभक्त आहोत. आम्ही राम मंदिरही बांधले आहे. आम्ही श्रीरामचंद्रांच्या विरोधात नाही, असे सिद्धरामय्या म्हणाले.
दरम्यान, काँग्रेस महात्मा गांधींच्या रामाची पूजा करते, तर भाजप त्यांची पूजा करत नाही. भाजपा श्रीरामाला, सीता आणि लक्ष्मणापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. हनुमान, लक्ष्मण आणि सीतेशिवाय श्रीराम अपूर्ण आहेत. श्रीराम फक्त अयोध्येपुरते मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत, असे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. आम्ही श्रीरामाच्या विरोधात आहोत, असे चित्र दाखवण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. पण, हे योग्य नाही, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले.