नवी दिल्ली : गुजरातनंतरकर्नाटकच्या शालेय अभ्यासक्रमातही भगवद्गीतेचा समावेश केला जाऊ शकतो. यासंदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी शुक्रवारी संकेत दिले. ते म्हणाले की, भगवद्गीता केवळ हिंदूंसाठी नाही, ती सर्वांसाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, ती शाळेत शिकवलीच पाहिजे.
याआधी गुजरातच्या भाजप सरकारने इयत्ता 6-12 च्या शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी काल शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश करण्याची घोषणा केली होती. हा टप्पा शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून लागू होईल. सरकारचा हा निर्णय गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांना लागू होणार आहे.
भगवद्गीता केवळ हिंदूंसाठी नाही, ती सर्वांसाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, ते शाळेत शिकवलेच पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला ठरवावे लागेल की शाळेत नैतिक शिक्षण पुन्हा सुरू करायचे की नाही, असे कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश म्हणाले.
याचबरोबर, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती स्थापन करावी लागेल, जी नैतिक शिक्षणात कोणते विषय असावेत, याचा निर्णय घेईल. ज्याचा मुलांवर चांगला प्रभाव पडतो, ते शिकवायला सुरुवात केली जाऊ शकते, मग ती भगवद्गीता असो, रामायण असो किंवा महाभारत असो, असे बी.सी. नागेश म्हणाले.