Karnataka Election 2018: एकच ठळक मुद्दा - जात... कर्नाटक निवडणुकीची 'खास बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 11:35 AM2018-04-23T11:35:58+5:302018-04-23T11:35:58+5:30

कर्नाटकात निवडणुकीत मतदानासाठी जात हा मुद्दा राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याचा मतदानाशी थेट संबंध आहे. कर्नाटक निवडणुकीसंदर्भातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या

Karnataka Election 2018: the ''caste" factor would decide next chief minister of Karnataka | Karnataka Election 2018: एकच ठळक मुद्दा - जात... कर्नाटक निवडणुकीची 'खास बात'

Karnataka Election 2018: एकच ठळक मुद्दा - जात... कर्नाटक निवडणुकीची 'खास बात'

Next
ठळक मुद्देकाँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाचे अध्यक्ष प्रचारात उतरले असून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच ट्वीटरवर आल्यामुळे गदारोळ, आरोप- प्रत्यारोप झाले होते.

बेंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू झाला आहे, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपा, काँग्रेस, जनता दल सेक्युलर अशी तिरंगी लढाई कर्नाटकात रंगणार आहे. अर्थातच, खरा सामना आहे तो, सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि भाजपाचे बी. एस. येडीयुरप्पा यांच्यात. दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीसंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे....

१) कर्नाटक विधानसभेची मुदत २८ मे रोजी संपत आहे. १२ मे रोजी नव्या विधानसभेसाठी मतदान होईल आणि १५ मे रोजी निकाल जाहीर झाल्यावर नव्या सरकारची स्थापना होण्यासाठी प्रयत्न सुरू होतील. 

२) कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ जागा असून त्यातील १७८ जागा सर्वसाधारण वर्गासाठी, ३६ जागा अनुसूचित जाती गटासाठी तर १५ जागा अनुसूचित जमाती गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मावळत्या विधानसभेत सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वातील काँग्रेसला १२२ जागा मिळाल्या होत्या. तसेच भाजपाला ४३ व जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाला ४० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी ३६.६ इतकी होती.

३) ही निवडणूक म्हणजे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा आणि सध्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यातील थेट लढत मानली जाते. येडीयुरप्पा हे मे २००८ ते जुलै २०११ या कालावधीत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 

४) काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाचे अध्यक्ष प्रचारात उतरले असून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच ट्वीटरवर आल्यामुळे गदारोळ, आरोप- प्रत्यारोप झाले होते. 

५) नव्या विधानसभेसाठी ४.९० कोटी मतदार मतदान करणार असून एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. 

६) मतदान केंद्रांची संख्या ९% नी वाढली असून ५६, ६९६ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येईल . प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक मतदान केंद्र पूर्णत: महिला चालवतील अशी घोषणा निर्वाचन आयोगाने केलेली आहे. अशा प्रकारे महिलांनीच चालवलेले मतदान केंद्र अस्तित्वात येण्याची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

७) सर्व मतदान केंद्रांमध्ये इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर केला जाईल. 

८) नवे सरकार स्थापन होण्यामध्ये मैसुर, मंगळुरु, उडुपी, रायचूर, बळ्ळारी, बदामी, विजापूर (उत्तर), विजापूर (दक्षिण) या जागांचा महत्त्वाचा वाटा असेल असे मानले जाते. 

९) या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जद सेक्युलर पक्षांबरोबरच काही इतर लहान पक्षही विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये कुर्ग नॅशनल कौन्सिल, कर्नाटक काँग्रेस पार्टी, कर्नाटक विकास पार्टी, कन्नड चळवळी वटल पक्ष, कन्नड क्रांती रंग हे पक्षही निवडणूक लढत असून निवडणूकतज्ज्ञ आणि आम आम आदमी पक्षाचे माजी नेते योगेंद्र यादव यांचा स्वराज पक्षही कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे.

१०) कर्नाटकात निवडणुकीत मतदानासाठी जात हा मुद्दा राजकीय पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण त्याचा मतदानाशी थेट संबंध आहे. लिंगायत आणि वक्कलिंग हे दोन समाज येथे प्रबळ असून लिंगायतांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहेत. सिद्धरामय्या यांनी वीरशैव लिंगायत व लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच कर्नाटकच्या स्वतंत्र ध्वजाची घोषणा व त्याचे प्रदर्शन केल्यामुळे ही निवडणूकसुद्धा केवळ जाती, धर्म, भाषा, अस्मितादर्शक प्रतिमा यांच्याबाहेर जाणार नाही याची पुरेपूर काळजी राजकीय पक्षांनी घेतली आहे.

Web Title: Karnataka Election 2018: the ''caste" factor would decide next chief minister of Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.