बेंगळुरूः कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिकाधिक वेग येत आहे. काँग्रेस, भाजपा आणि जनता दल धर्मनिरपेक्ष या तीन प्रमुख पक्षांमध्ये ही निवडणूक होत आहे. इतर अनेक लहान पक्ष या निवडणुकीतून विधानसभेत जाण्याची धडपड करत असले तरी खरी लढत याच तीन पक्षांमध्ये होत आहे. ओपिनियन पोलने दाखवलेल्या अंदाजामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणालाही पूर्ण बहुमत मिळेल असा थेट कौल मिळालेला नाही. तर येणारी विधानसभा त्रिशंकू असेल असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र सर्व ओपिनियन पोलमधून माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाला किंगमेकर होण्याची संधी चालून येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
एच.डी. देवेगौडा यांनी आताच आपण भाजपाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा कल काँग्रेसकडे आहे. मात्र यापूर्वी त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केले असल्यामुळे आगामी काळात त्यांचा पक्ष कोणाच्या बरोबर जातो याबाबत निश्चित सांगता येणार नाही.
माजी मुख्यमंत्री- माजी पंतप्रधान देवेगौडा यांचं कर्नाटकाच्या राजकारणातील स्थानः
देवेगौडा यांचं मूळ नाव हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा असं आहे. त्यांचा जन्म पूर्वीच्या म्हैसुर प्रांतातील होळेनरसिंहपूर तालुक्यात हरदनहळ्ळी येथे 18 मे 1933 रोजी झाला. सध्या हे गाव हसन जिल्ह्यामध्ये आहे. वक्कलिंग समाजात जन्मास आलेले देवेगौडा यांचे वडील दोड्डेगौडा हे शेतकरी होते. देवेगौडा यांच्या आईचे नाव देवम्मा होते.हसनच्या एल. व्ही. पॉलिटेक्निकमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका संपादन केल्यानंतर त्यांनी 1954 साली चंद्रम्मा यांच्याशी विवाह केला. त्यांच्या सहा अपत्यांपैकी एच. डी. रेवण्णा आणि एच. डी. कुमारस्वामी हे कर्नाटकच्या राजकारणात त्यांच्याबरोबरच काम करू लागले. 1953 साली देवेगौडा यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आणि त्यापुढे 9 वर्षे ते काँग्रेसमध्येच राहिले.
1962 साली ते होळेनरसिंहपूर मतदारसंघातून कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदा निवडून गेले. यानंतर ते 1989 पर्यंत सलग सहा वेळा याच विधानसभा मतदारसंघातून निवडून येत राहिले. त्यांनी कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका मार्च 1972 ते मार्च 1976 आणि नोव्हेंबर 1976 ते डिसेंबर 1977 या कालावधीत सांभाळली यावेळेस ते काँग्रेस (ओ) या पक्षाचे सदस्य होते. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना कारागृहातही जावे लागले. बेंगळुरूच्या मध्यवर्ती कारागृहातच त्यांना आणीबाणीचा काळ काढावा लागतो. देवेगौडा यांना जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दोन वेळा सोपविण्यात आली होती. 1983 ते 1988 या काळामध्ये रामकृष्ण हेगडे यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळाले. 1994 साली देवेगौडा यांनी कर्नाटकचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
पंतप्रधानपदाची जबाबदारी आणि पुढील राजकीय वाटचाल-
1996 साली संयुक्त मोर्चा म्हणजेच युनायटेड फ्रंटने देवेगौडा यांना आपला नेता म्हणून निवडले आणि त्यांनी भारताचे 11 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दक्षिण भारतातून पंतप्रधान म्हणून संधी मिळालेले ते पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव नेते आहेत. 1 जून 1996 ते 11 एप्रिल 1997 या कालावधीत ते पंतप्रधानपदावर होते.
जनता दल धर्मनिरपेक्षची स्थापना-
1977 साली जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व विरोधी पक्ष जनता दल या नावाने एकवटले होते. 1988 साली जनता दलाची स्थापना करण्यात आली. जनता दलाने भारतीय जनता पार्टी व इतर पक्षांच्या पाठबळावर 1989 साली केंद्रात सरकार स्थापन केले होते. त्यासाठी नॅशनल फ्रंट गव्हर्नमेंट संज्ञा वापरली जाते. यामधील देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांनाही पुढे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. 1999 मध्ये आघाडीतील काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काही नेत्यांनी देवेगौडा यांच्या साथीने जनता दल धर्मनिरपेक्ष पक्षाची स्थापना केली आणि ते त्या पक्षाचे अध्यक्ष झाले. 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला मात्र 2002 साली कनकपुरा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ते विजयी झाले. 2004 साली जनता दल सेक्युलर पक्षाला 59 जागा मिळाल्या आणि त्यांनी सरकार स्थापनेसाठी आघाडीत प्रवेश केला. 2006 साली भारतीय जनता पार्टी आणि जनता दल सेक्युलर यांनी संयुक्त सरकार स्थापन केले. 2006 ते 2008 या कालावधीसाठी त्यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी राहिले. मात्र 2008 साली त्यांच्या पक्षाला केवळ 28 जागांवर समाधान मानावे लागले.
साथ सोडलेले नेते मुख्यमंत्री झाले-
2008 साली सत्तास्थापनेच्या वाटाघाटींनुसार देवेगौडा यांनी भाजपाचे येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा देण्याचे नाकारले होते. तसेच सिद्धरामय्या यांनाही देवेगौडा यांना पक्षाबाहेर काढले होते. हे दोन्ही नेते पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. आता सिद्धरामय्या आणि येडीयुरप्पा यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. अशा स्थितीत एकेकाळी आपल्याच पक्षात असणाऱ्या नेत्याला देवेगौडा पाठिंबा देणार की ज्यांच्या पाठिंब्यावर 20 महिने सरकार चालवले त्या भाजपाला पाठिंबा देणार हे पाहायला हवे.