बेंगळुरू - कर्नाटकातील राजकीय वातावरण अधिक तापण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. बेंगळुरूमध्ये ठाण मांडून बसलेले काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. ''बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आता भाजपानं फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. काही आमदारांना मंत्रिपदाची तर काहींना पैशांचे आमिष दाखवले जात आहे. मात्र अशा प्रलोभनांना बळी न पडणाऱ्यांना भाजपानं आयटी आणि ईडीच्या धाडी टाकण्याचीदेखील धमकी दिली आहे'', असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
यावेळी आझाद यांनी राज्यपालांवरही निशाणा साधला आहे. आझाद म्हणालेत की, कर्नाटकात विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाकडे 104 जागा आहेत, आमच्याकडे (काँग्रेस +जेडीएस) 117 जागा आहेत. यामुळे राज्यपाल पक्षपातीपणा करू शकत नाहीत. घटनेच्या संरक्षणासाठी असलेले राज्यपाल स्वतःच घटना कशी काय उद्ध्वस्त करू शकतात?,प्रश्नदेखील आझाद यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, भाजपानं कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिल्याचा दावा काँग्रेसचे आमदार अमरगौडा बयपुरा यांनी केला आहे. मात्र भाजपाची ऑफर नाकारल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.