बेंगळुरू - कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपा नेते बीएस येडियुरप्पा आणि जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे आता कर्नाटकात कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसनं राज्यपालांवर पक्षपातीपणा करत असल्याचा थेट आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला आहे. कर्नाटकचे राज्यपाल भाजपाच्याच बाजूने जाणार असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ''सत्ता आहे म्हणून भाजपाने दुरुपयोग करू नये. भाजपाचीसुद्धा वेळ येणार आहे. सत्ता गेल्यावर त्यांचीही चौकशी होणार'',असेही ते म्हणालेत.
सत्तेसाठी कर्नाटक!, जेडीएसला काँग्रेसचा हात
कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या काँग्रेसने आता जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा जाहीर केल्याने सत्तेसाठी तिथे खरोखरच ‘सत्तेचे कर-नाटक’ पाहायला मिळणार आहे. भाजपाचे नेते येडियुरप्पा, तसेच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी मंगळवारी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊ न सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाचे १0४ जण निवडून आले आहेत. काँग्रेसचे ७८ व जनता दलाचे ३७ व बसपाचा एक निवडून आले असून, त्यांची बेरीज ११६ होते. सत्तेसाठी सध्या ११२ आमदारांची गरज आहे. भाजपाकडे ७ आमदार कमी असून, ते मिळविण्यासाठी जनता दल व काँग्रेस यांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होऊ शकतील. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. कदाचित, जनता दलही त्याचे अनुकरण करू शकेल. बहुमत मिळाले नसले, तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल भाजपालाच सरकार स्थापनेसाठी बोलाविण्याची चिन्हे आहेत.
राज्यपालांपुढे 4 पर्यायकोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर राज्यघटनेनुसार सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी कोणते पर्याय तपासावेत, याची शिफारस सरकारी आयोगाने केली होती. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यापुढे हे चार पर्याय, त्याच क्रमाने, उपलब्ध आहेत:१. सर्वाधिक जागा मिळविणारा वा निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या पक्षांना पाचारण करणे.- येथे काँग्रेस आणि जेडीएसने निवडणूकपूर्व आघाडी न केल्याने हा पर्याय कामी नाही. भाजपाला प्रथम बोलविले जाईल.२. अपक्षांसह इतरांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा सर्वाधिकजागा जिकणाऱ्या पक्षाने केल्यास त्यांना निमंत्रण देणे.- यानुसारही भाजपाला फायदा होईल.३. निवडणुकीनंतर आघाडी केलेले सर्व पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांना संधी देणे.- भाजपा बहुमतासाठीच्या फोडाफोडीत अपयशी ठरल्यास काँग्रेस-जेडीएसला पाचारण केले जाईल.४. निवडणुकीनंतर आघाडी केलेल्या पक्षांपैकी काही सरकारमध्ये राहून व काही बाहेरून पाठिंबा देणार असतील, तर त्यांना बोलावणे.- येथेही काँग्रेस-जीडीएसला संधी मिळेल़