Karnataka Election 2018 : भाजपा की काँग्रेस? किंगमेकर देवगौडांनी दिले महत्वपूर्ण संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2018 12:42 PM2018-05-13T12:42:19+5:302018-05-13T12:42:19+5:30
देवगौडांचा जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा एक्झिट पोल्सचा अंदाज
बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी निकालानंतरची जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणुकीच्या निकालाला अद्याप दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अनेक एक्झिट पोल्समधून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं चित्र पुढे आलं आहे. काँग्रेस आणि भाजपाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्यानं जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी निकालानंतरच्या भूमिकेबद्दल महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. 'सध्या कोणतीही ऑफर स्वीकारण्याची किंवा नाकारण्याच्या स्थितीत नाही. 15 मे रोजी मतमोजणी सुरू झाल्यावर काय होतं ते पाहू,' असं देवेगौडा यांनी म्हटलं.
देवगौडा यांच्या विधानातून महत्त्वपूर्ण संकेत मिळत आहेत. देवगौडा यांचा पक्ष काँग्रेस किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करु शकतो, अशी शक्यता यामधून व्यक्त करण्यात येत आहे. जनता दल सेक्युलर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, अशी भूमिका याआधी देवगौडा यांनी घेतली होती. मात्र शनिवारी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर त्यांच्या या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. काँग्रेस आणि भाजपला मिळणाऱ्या जागांमधील अंतर अतिशय कमी असेल. त्यामुळे जनता दल सेक्युलर किंगमेकर होईल, असं बहुतांश एक्झिट पोल्सच्या आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळेच देवगौडा यांनी, सध्या कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या स्थितीत नसल्याचं म्हटलं आहे.
जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज अनेक एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांच्या पक्षालाच बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. '17 मे रोजी भाजपालाच कौल मिळेल, याची खात्री आहे. आम्ही 125 ते 130 जागा जिंकू. मात्र काँग्रेसला 70 जागांचा आकडाही गाठता येणार नाही. तर जनता दल सेक्युलर जास्तीत जास्त 24-25 जागा जिंकेल,' असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.