बेंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसने सुरुवातीलाच आघाडी घेतली आहे. दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या चांमुडेश्वरी मतदारसंघात पिछाडीवर आहेत तर बदामी मतदारसंघातून आघाडीवर आहेत. सिद्धारामय्या हे चामुंडेश्वरी आणि बदामी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, दुपारपर्यंत कर्नाटकचा कौल कुणाला ते स्पष्ट होणार आहे. सामना अटीतटीचा असल्याने निकालाच्यावेळी काही अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कमालीची दक्षता घेतली आहे. आजपासूनच कर्नाटकात सर्वत्र, त्यातही ३८ मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
LIVE UPDATES :
- एबीपी न्यूज आणि इंडिया टुडेच्या आकड्यांनुसार भाजपा 73 जागांवर पुढे
- जेडीएस 25 जागांवर आघाडीवर
- मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरीतून पिछाडीवर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी होणार असलेल्या मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र कर्नाटकात स्वाभाविकच या अटीतटीच्या सामन्याच्या निकालाकडे जरा जास्तच उत्सुकता आहे. पोलिसांनी या सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच केंद्रांच्या परिसरात बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक किंवा उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निमलष्करी दल, राखीव पोलीस दलही कर्नाटक पोलिसांच्या मदतीला तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्ताचे प्रमुख असलेल्या प्रत्येक अधीक्षकाला आवश्यकता भासल्यास शीघ्र कृती दलाचा वापर करण्याचे अधिकार दएम्यात आले आहेत. निकालानंतर जल्लोष, मिरवणुकी काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्नाटकातील सीमाभागाचा समावेश असलेला मुंबई कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक, मध्य कर्नाटक, कोस्टल कर्नाटक, म्हैसूर कर्नाटक, बंगळुरु कर्नाटक या सर्व विभागांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. अवघे ४० टक्के मतदान झालेल्या बंगळुरुचा अपवाद वगळता राज्यभरात सत्तरीचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित निकालांचीही शक्यता आहे. त्यामुळेच निकालानंतर भलतं काही घड़ू नये यासाठी पोलिसांनी कमालीची खबरदारी घेतली आहे.