कर्नाटकच्या महासंग्रामाचा मंगळवारी निकाल लागणार आहे. कर्नाटकची सत्ता नेमकी कुणाला, या प्रश्नाचे मतदानयंत्रांमध्ये दडलेले उत्तर मंगळवारी दहानंतर उघड होऊ लागेल. मात्र सत्तेच्या सौदागरांनी त्याआधीच सत्तेची समीकरणे मांडण्यास सुरुवात केली आहे. तीन प्रमुख पक्षांच्या या सत्तासंघर्षात सत्तास्थापनेसाठी सहा समीकरणे मांडली जात आहेत. www.lokmat.com ने घेतलेला या समीकरणांचा आढावा:
सत्तेचे समीकरण - १: परंपरा मोडणार, काँग्रेसची सत्ताखरेतर १९८८पासून कर्नाटकात सत्तेवर असलेला पक्ष कधीच सत्ता राखू शकलेला नाही. शेवटची अशी सत्ता रामकृष्ण हेगडे यांची होती. १९८३मध्ये सत्तेवर आलेल्या रामकृष्ण हेगडे यांनी १९८८मध्ये सत्ता टिकवली, मात्र सत्ताधारी पक्षाने सत्ता टिकवण्याचे ते शेवटचेच उदाहरण. त्यानंतर कोणत्याही पक्षाला तसे करता आले नाही. मात्र यावेळी सिद्धारामय्या यांनी ती परंपरा मोडली तर चमत्कारच घडले. पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येईल. तेच मुख्यमंत्री होतील. सोबतीला फारतर एखादा दलित आणि लिंगायत समाजाचे असे दोन उपमुख्यमंत्री घेऊन सत्तेचा सामाजिक समतोल साधून २०१९ची तयारी करु लागतील.
सत्तेचे समीकरण - २: परंपरा कायम, काँग्रेस घरी, भाजपा सत्तेवरगेल्या तीस वर्षातील परंपरेनुसार सत्ताधारी पक्षाची सद्दी संपून काँग्रेस घरी जाऊन भाजपाला सत्तास्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ मिळाले तर घोषित केल्याप्रमाणे येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांनी मुहुर्त आधीच जाहीर केला आहे. मात्र २०१९ची निवडणूक लक्षात घेऊन त्यांनाही सामाजिक समीकरणांचे राजकारण सांभाळावे लागेल. त्यातही दलित समाजाची साथ मिळवण्यासाठी काही दलित जातींवर प्रभाव असणाऱ्या श्रीरामूलू यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाईल. त्यामुळे तो समाजही आणि श्रीरामुलूंचे राजकीय गॉडफादर गली जनार्दन रेड्डी यांचीही मर्जी राखली जाईल. त्या पट्ट्यातील लोकसभा मतदारसंघातही लाभ मिळेल.
सत्तेचे समीकरण - ३: धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा, काँग्रेस-जनता दल सरकारबहुतेक राजकीय जाणकारांनी तसेच अनेक मतदानोत्तर जनमत चाचण्यांनी वर्तवलेले अंदाज खरे ठरले तर राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. त्या परिस्थितीत जर काँग्रेसकडे भाजपापेक्षा जास्त जागा असतील तर जनता दलाला धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर सोबत आणणे त्यांना सोपे जाईल. त्या परिस्थितीत काँग्रेसचा मुख्यमंत्री आणि जनता दलाचे कुमारस्वामी उपमुख्यमंत्री असे सत्तेचे वाटप होईल. अर्थात त्या परिस्थितीत सिद्धारमय्याच मुख्यमंत्री असतील असे नाही. मूळ जनता दलाचे असलेले सिद्धारामय्या यांना त्यांचे जुने नेते देवेगौडा कितपत मान्य करतील याबद्दल शंका आहे. त्यापरिस्थितीत सिद्धारामय्यांऐवजी अन्य कुणी मुख्यमंत्री करण्याच्या अटीवरच जनता दल पाठिंबा देऊ शकेल. लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे किंवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष परमेश्वरन मुख्यमंत्री होऊ शकतील. अर्थात सिद्धारामय्या यांच्यासाठी तडजोडीचा काय फॉर्म्युला ठरतो त्यावर बरेच काही अवलंबून राहील. नाहीतर २००८मध्ये भाजपाने राबवलेले विरोधी आमदार फोडण्याचे ऑपरेशन लोटस पुन्हा राबवण्याची संधी भाजपाला मिळेल. काँग्रेसची सत्ता अल्पजीवी ठरु शकेल. कदाचित भूतकाळात भाजपाशी केलेल्या समान काळासाठीच्या सत्तावाटपासारख्या समीकरणासाठी जनता दल अडून बसू शकेल.
सत्तेचे समीकरण - ४: भाजपा ९०च्या खाली, जनता दलासोबत ३० - ३० ची सत्तावाटणीभारतीय जनता पार्टीचे संख्याबळ ९० च्या खाली गेले आणि बहुमत न मिळवता काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तरीही भाजपाचे चाणक्य काँग्रेसला सत्तेपासून दूर राखण्यासाठी वेगळी चालही खेळू शकतील. तशा परिस्थितीत २००३ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी कुमारस्वामींच्या साथीने केलेल्या २०-२० महिन्यांच्या सत्तासमीकरणासारखा प्रयोग केला जाईल. यावेळी ६० महिने हाती असल्याने ३०-३० महिन्यांची सत्तावाटणी केली जाईल. मात्र त्यावेळी कुमारस्वामींनी दिलेला दणका भाजपा...त्यातही येडियुरप्पा विसरले नसणार. २० महिन्याच्या मुख्यमंत्रीपदानंतर कुमारस्वामींनी भाजपाला पद दिले नव्हते. त्यामुळे यावेळी प्रथम भाजपाला अर्थातच येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद अशी अट असेल.
सत्तेचे समीकरण - ५: जनता दलाची सत्ता, भाजपाचा बाहेरुन पाठिंबाअगदीच दुर्मिळ असलेली ही शक्यता. मात्र माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा महत्वाकांक्षी स्वभाव लक्षात घेता हे समीकरणही अगदीच नाकारता येत नाही. निकालानंतरची परिस्थिती अगदीच अटीतटीची असेल तर देवेगौडा तशी चाल खेळतील. अर्थात जनता दल ४०च्यावर गेले आणि भाजपा आतापर्यंतच्या सर्वोत्तम निकालाच्या म्हणजे ७५जागांवरच अडली तर देवेगौडांना तशी संधी मिळू शकेल. त्या परिस्थितीत ते भाजपाचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करतील. कदाचित त्या परिस्थितीत भाजपा त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्यापेक्षा बाहेरुन पाठिंबा देऊन २०१९च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत संयम राखेल.
सत्तेचे समीकरण - ६: राष्ट्रपती राजवट, विरोधी पक्ष फोडून भाजपा सत्तेवरकर्नाटकच्या जनेतेने भाजपा आणि काँग्रेसला समसमान जागा दिल्या. आणि जनता दलाला फार यश मिळाले नसेल, तरीही जनता दल अडून बसत असेल तर राष्ट्रपती राजवटीचे वेगळा पर्यायही आजमावला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यपालांच्या माध्यमातून पक्षहिताला अनुकूल सत्ता राबवणेही शक्य होईल. दरम्यानच्या काळात साथीला असलेल्या रेड्डी बंधूंच्या माध्यमातून ऑपरेशन लोटस अमलात आणून आवश्यक संख्याबळही मिळवून सत्तेचे समीकरण जमवता येऊ शकते.