Karnataka Election 2018: सट्टाबाजारात भाजपाची हवा; जेडीएस किंगमेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 09:18 AM2018-05-14T09:18:00+5:302018-05-14T09:18:00+5:30
भाजपाला सट्टाबाजारात सर्वाधिक पसंती मिळताना दिसतं आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला जनता दल सेक्युलरची मदत घ्यावी लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.
बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सट्टाबाजारात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. सत्ताबाजारात कोणाला कौल मिळणार, यावरुन सट्टाबाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू आहे. भाजपाला सट्टाबाजारात सर्वाधिक पसंती मिळताना दिसतं आहे. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाला जनता दल सेक्युलरची मदत घ्यावी लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी शनिवारी मतदान झालं. यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्समधून भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला, तरी त्यांच्याकडे बहुमत नसेल, असे एक्झिट पोलचे आकडे सांगतात. सट्टाबाजारातदेखील हाच ट्रेंड पाहायला मिळतो आहे. भाजपाला 96 ते 98 जागा मिळतील, तर काँग्रेस 85 ते 87 जागांवर विजयी होईल, असा सट्टाबाजाराचा अंदाज आहे.
अशा प्रकारे लावला जातो सट्टा
एक-वर-एक ट्रेडनुसार, जर एखाद्या व्यक्तीनं भाजपावर 1 लाखाचा सट्टा लावला आणि पक्षाला 98 किंवा त्याहून जास्त जागा मिळाल्या, तर त्या व्यक्तीला 2 लाख रुपये मिळतील. 'भाजपावर सर्वाधिक सट्टा लावला जात आहे. निवडणूक प्रचार संपताच सट्टेबाजांनी जोखीम पत्करण्यास सुरुवात करत कोट्यवधी रुपये लावले जात आहेत,' असं एका सट्टेबाजानं सांगितलं. कर्नाटकमध्ये भाजपा सत्ता स्थापन करेल, असं सट्टेबाजांना वाटतं. मात्र त्यासाठी भाजपाला तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाची गरज लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जनता जल सेक्युलर हा पक्ष 32 ते 35 जागा मिळवून किंगमेकर ठरेल, असा सट्टाबाजाराचा अंदाज सांगतो.