बेंगळुरू - अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अटीतटीची लढत याठिकाणी पाहायला मिळत आहे. निवडणुकीचा निकाल येत्या काही तासांवर येऊन ठेपलेला असताना योगगुरु रामदेव बाबा यांनी मोठे विधान केले. ''कर्नाटक निवडणुकीचा निकाल देशाच्या राजकारणाला नवी दिशा देईल. कारण, जो पक्ष ही निवडणूक जिंकेल त्यांच्यात 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकण्याची क्षमता असेल'', असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मात्र कर्नाटकात स्वाभाविकच या अटीतटीच्या सामन्याच्या निकालाकडे जरा जास्तच उत्सुकता आहे. पोलिसांनी या सर्व मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच केंद्रांच्या परिसरात बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षेचे प्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक किंवा उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निमलष्करी दल, राखीव पोलीस दलही कर्नाटक पोलिसांच्या मदतीला तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्ताचे प्रमुख असलेल्या प्रत्येक अधीक्षकाला आवश्यकता भासल्यास शीघ्र कृती दलाचा वापर करण्याचे अधिकार दएम्यात आले आहेत. निकालानंतर जल्लोष, मिरवणुकी काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कर्नाटकातील सीमाभागाचा समावेश असलेला मुंबई कर्नाटक, हैदराबाद कर्नाटक, मध्य कर्नाटक, कोस्टल कर्नाटक, म्हैसूर कर्नाटक, बंगळुरु कर्नाटक या सर्व विभागांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे. अवघे ४० टक्के मतदान झालेल्या बंगळुरुचा अपवाद वगळता राज्यभरात सत्तरीचा टप्पा ओलांडला गेला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अनपेक्षित निकालांचीही शक्यता आहे. त्यामुळेच निकालानंतर भलतं काही घड़ू नये यासाठी पोलिसांनी कमालीची खबरदारी घेतली आहे.