कर्नाटकात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला आता निश्चित झालाय. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांची पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली. तसंच सिद्धरामय्या यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली जाणार आहेत. याशिवाय २०२४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत ते प्रदेशाध्यक्ष म्हणूनदेखील कार्यरत राहतील.
कर्नाटक ते दिल्ली १०० तास सुरू असलेल्या चर्चांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. सोनिया गंघी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटल्याचं म्हटलं जातंय. आता २० मे रोजी नवं सरकार स्थापन होणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. मात्र, वेळोवेळी प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा मांडत राहिले. निवडणुकांमधील विजयानंतर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जोर लावला होता. तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांड सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या बाजूने होते. मात्र, शिवकुमार मुख्यमंत्रीपदाऐवजी काहीही स्वीकारण्यास तयार नव्हते.
१०० तास दिल्ली ते बंगळुरू बैठका
- १३ मे रोजी निकाल जाहीर झाले आणि काँग्रेसला १३५ जागांवर विजय मिळाला.
- १२ मे रोजी बंगळुरूत काँग्रेसच्या विधीमंडळ समितीची बैठक झाली. यामध्ये मल्लिकार्जून खर्गे मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेतील असं ठरवण्यात आलं.
- १५ मे रोजी पर्यवेक्षक दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी खर्गेंकडे आपला अहवाल सोपवला.
- यानंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला बोलावण्यात आलं. यामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावांवर चर्चा झाली पण सहमती झाली नाही.
- १५ मे ला सिद्धरामय्या दिल्लीत पोहोचले, पण तब्येतीचं कारण देत शिवकुमार आले नाही.
- १६ मे रोजी शिवकुमारही दिल्लीत आले. खर्गेच्या निवासस्थानी बैठक पार पडली. यावेळी राहुल गांधीदेखील उपस्थित होते.
- १७ मे चा दिवस महत्त्वाचा होता. यादरम्यान अनेक बैठका पार पडल्या.
- सकाळी केसी वेणुगोपाल यांनी राहुल गांधींची भेट घेतली. नंतर ११.३० वाजता सिद्धरामय्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. १२.३० वाजता राहुल गांधी आणि शिवकुमार यांची बैठक पार पडली.
- १२ वाजता कर्नाटकचे काँग्रेसचे प्रभावी रणदीप सुरजेवाला यांनी १२ वाजता खर्गेंची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार यानंतर सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांना खर्गेंची भेट घेण्यास सांगितलं. त्यांच्यात २ तास चर्चा झाली. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाशिवाय आणखी कोणतंही पद घेण्यास तयार नव्हते.
- काही आमदारांनीही खर्गेंची भेट घेतली. मंत्रिमंडळाबाबत त्यांनी भेट घेतल्याचं म्हटलं जातंय.
सोनिया गांधींचा हस्तक्षेप
कर्नाटकात मध्यरात्री उशिरा सरकार स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटलं आहे. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार झाले आहे. तर सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री असतील.