'मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर काही नको' यावर ठाम होते डीके शिवकुमार; गांधी परिवाराने सोडवला कर्नाटकचा गुंता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:24 AM2023-05-18T11:24:59+5:302023-05-18T11:25:40+5:30
गेल्या दोन दिवसापासून कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसापासून कर्नाटककाँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अनेक बैठका घेऊन काँग्रेसनेकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सोडवला. सिद्धरामय्या हे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील आणि प्रदेश काँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. मात्र, डीके शिवकुमार काल सायंकाळपर्यंत 'मुख्यमंत्रीपद द्या नाहीतर काहीही नको' या आपल्या आग्रहावर ठाम होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांना उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेशाध्यक्षांसह महत्त्वाच्या मंत्रिपदांची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती.
ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटे यांचं निधन; 'जीवनवाहिनी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड
दुसरीकडे, सिद्धरामय्या यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांचा पाठिंबा दर्शवून मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०२४ चे समीकरण लक्षात घेऊन हायकमांडला ते मुख्यमंत्रीपदी हवे होते. ते कुरुबा समाजातून येतात आणि ओबीसी व्होट बँकसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. जवळपास चार दिवसांपासून सुरू असलेली बैठकांची फेरी अखेर बुधवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीने संपली. ते सध्या शिमल्यात असून त्यांनी डीके शिवकुमार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित होते.
सोनिया गांधी यांनी डीके शिवकुमार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला
सोनिया गांधी यांच्याशी बोलल्यानंतर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठी सहमती दर्शवली. सोनिया गांधी यांनी डीकेएस यांना सांगितले की, पक्षाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठा आणि समर्पणाचे फळ त्यांना नक्कीच मिळेल, याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. काँग्रेसने नामनिर्देशित केलेले कर्नाटकचे तीन निरीक्षक सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह आज बेंगळुरूला जाणार आहेत, तिथे सिद्धरामय्या यांची नेता म्हणून औपचारिकपणे निवड करण्यासाठी संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. नवीन सरकारचा शपथविधी २० मे रोजी बेंगळुरूच्या कांतेराव स्टेडियमवर होणार आहे.
डीके शिवकुमार हे गेल्या चार वर्षातील त्यांच्या कामाचा दाखला देत सर्वोच्च पदासाठी झटत होते. मंगळवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी बंगळुरू विमानतळावर पत्रकारांशी बोलताना या पदासाठी कोणालाही ब्लॅकमेल करणार नाही, असे सांगितले होते. काँग्रेस पक्षाला आईचा दर्जा देत त्यांनी आपण समर्पित कार्यकर्ता असल्याचे सांगितले होते. पक्षाचे राज्य युनिट प्रमुख डीके शिवकुमार यांनी आज संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) बैठक बोलावली आहे. त्यांनी कर्नाटकातील सर्व नवनिर्वाचित काँग्रेस आमदारांना पत्र लिहून बेंगळुरूच्या क्वीन्स रोडवरील इंदिरा गांधी भवनात सायंकाळी ७ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या बैठकीत विधान परिषदेचे सदस्य आणि खासदारांनाही बोलावण्यात आले आहे.