Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एका जाहिरातीवरून वाद वाढला आहे. भाजपनं या प्रकरणी कर्नाटक काँग्रेस कमिटी, डीके शिवकुमार, सिद्धरामय्या आणि राहुल गांधी यांना कायदेशीर नोटीस पाढवली आहे. तसंच यासंदर्भात तक्रारही केली आहे.. त्याचवेळी, निवडणूक आयोगाने ही जाहिरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचं मानलं आहे. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून आयोगाने काँग्रेसला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
निवडणूक आयोगाने काँग्रेसला रविवारी ७ मे रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत या नोटिशीला उत्तर देण्यास सांगितलं आहे. आचारसंहितेच्या तरतुदी २ भाग १ नुसार, निवडणूक प्रचारादरम्यान, विरोधी पक्षाची धोरणे आणि समस्यांबद्दल बोलता येतं. परंतु कोणाच्या वैयक्तिक जीवनाबद्द, ज्याचा जनतेशी काहीही संबंध नाही, याबद्दल बोलता येत नाही. म्हणजे पुष्टी नसलेल्या आणि निराधार आरोपांवर काहीही बोलणे, किंवा कृत्य करणं, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरतं.
… तर कारवाई होणार?
निवडणूक आयोगानं कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्षांना नोटीस बजावली असून, नोटीसला दिलेल्या मुदतीत उत्तर न मिळाल्यास आयोग तुम्हाला काही बोलायचं नाही, असं गृहीत धरेल, असा इशाराही दिला आहे. त्यानंतर आयोग या आरोपावर योग्य ती कायदेशीर कारवाई करेल. काँग्रेसची ही जाहिरात ५ मे रोजी भाजप नेते ओमप्रकाश यांच्याद्वारे निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली.
निवडणूक आयोग म्हणाले…
वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसनं भाजपला अडचणींचं इंजिन असं म्हटलं. तसंच २०१९ आणि २०२३ दरम्यान राज्यातील भ्रष्टाचाराचे दर दाखवणारा एक पोस्टर जारी केला. दरम्यान, यासंदर्भातील आता पुरावे सादर करण्यास सांगितलं आहेत. तसंच याबद्दल काही माहिती असेल तर ७ मे संध्याकाळी ७ पर्यंत यावर स्पष्टीकरण द्यावं आणि ती सार्वजनिक डोमेनवरही टाकावी, असंही आयोगानं म्हटलंय.