Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या. तर काँग्रेसने तब्बल १३६ जागांवर विजय मिळवला. या पराभवाबरोबरच भाजपाच्या दक्षिण भारतातील अभियनाला मोठा धक्का बसला आहे. पण, चर्चा सुरू झाली आहे ती किंग कोहलीची.... भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. कोहली एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये राहुल गांधींचा एक फोटो आहे ज्यात विराट कोहली कर्नाटक निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करत आहे. इतकेच नाही तर काँग्रेस पक्षाच्या या विजयाचा संबंध कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाशी जोडला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विराट कोहलीच्या नावाच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये 'द मॅन, द मिथ, द लीडर, राहुल गांधी' असे लिहिले आहे.
मात्र, ही इंस्टाग्राम स्टोरी खोटी असल्याचे तपासात समोर आले. विराट कोहलीची जी इंस्टाग्राम स्टोरी सांगितली जात आहे ती कोणीतरी एडिट करून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.विराट कोहली व गौतम गंभीर यांच्यात आयपीएल २०२३ मध्ये वाद झाला होता. गंभीर हा लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक आहे आणि तो भाजपाचा खासदारही आहे. त्यामुळे विराटची ही बनावटी इस्टा स्टोरी व्हायरल करून नेटिझन्स गौतम गंभीरला ट्रोल करताना दिसत आहेत.