Karnataka Election 2023: इम्रान आणि माफिया अतिक चांगले मित्र; काँग्रेसने स्टार प्रचारक बनवताच भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 02:41 PM2023-04-20T14:41:44+5:302023-04-20T14:42:52+5:30
राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांना काँग्रेसने स्टार प्रचारक बनवले आहे.
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसने पक्षाचे राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांना आपला स्टार प्रचारक बनवल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाने यावरुन काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. माफिया अतिक अहमद हा इम्रान प्रतापगढीचा गुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
काय आहे भाजपचा आरोप
कर्नाटकातील भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनी काँग्रेसवर देसद्रोहासारखा गंभीर आरोप केला आहे. इम्रान प्ररतापकढी यांनी अतिक अहमदसोबत स्टेज शेअर केला होता. ते दोघेही चांगले मित्र आहेत. इम्रान अतिकला गुरु आणि भाऊ मानायचे. इम्रान यांनी कर्नाटकात येऊन हिंदुविरोधी भाषण केले. ते म्हणाले होते की, मुस्लीम हे डोकं टेकवणारे नाही तर ते डोकं कापणारे लोक आहेत.'
शोभा करंदलाजे पुढे म्हणाल्या की, अतिक अहमद हा इम्रान प्रतापगढीला जेवणासाठी घरी बोलवायचा. तो अतिकवर शेर आणि कविता लिहायचा. अतिक अहमद स्टेजवर यायचा, तेव्हा त्याच्यावर लिहिलेल्या कविता इम्रान प्रतापकढी ऐकवायचे. अशा नेत्याला काँग्रेसने त्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. यावरुनच काँग्रेसचा हात गद्दारांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस आणि तुष्टीकरण हे समानार्थी शब्द
इम्रान प्रतापगढीबाबत संबित पात्रा म्हणतात की, भारताविरोधात बोलणाऱ्या अशा लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी काँग्रेस अनेक दिवसांपासून काम करत आहे. अशा पक्षाकडून चांगल्याची अपेक्षा करता येत नाही. मोदी तुमची कबर खोदणार असे म्हणणारा हा पक्ष आहे. त्यामुळे त्यांचा स्टार प्रचारक इम्रान प्रतापगढी यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करता येईल. काँग्रेस आणि तुष्टीकरण हे दोन्ही एकमेकांचे समानार्थी शब्द बनले आहेत.