बंगळुरू : कर्नाटक दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा काँग्रेस आणि जेडीएसवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, जेडीएस आणि काँग्रेस हे कर्नाटकच्या विकासातील सर्वात मोठे अडथळे आहेत. ते टीम म्हणून लढले तरी कर्नाटकमधील जनता त्यांना सत्तेवर येण्याची संधी देणार नाही, असेही ते म्हणाले.
कर्नाटकची ही निवडणूक केवळ आमदार, मंत्री किंवा येत्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवण्याची निवडणूक नाही. येत्या 25 वर्षात विकसित भारताच्या रोडमॅपचा पाया मजबूत करण्यासाठी ही निवडणूक आहे. कर्नाटकातील जनतेला राज्याच्या विकासासाठी डबल इंजिनचे सरकार निवडून द्यावे लागेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय, काँग्रेसवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस हा पक्ष जुने इंजिन आहे, जे नेहमीच विकासात अडथळा आणते. काँग्रेस पक्षाने काहीही केले तरी कर्नाटकची जनता खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकणार नाही.
याचबरोबर नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस सरकारने कधीही शेतकऱ्यांची काळजी घेतली नाही, परंतु भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी बियाण्यांपासून बाजारपेठेपर्यंत काम करत आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधीला पाठवलेल्या पैशात येथील भाजप सरकारने आणखी 4 हजार रुपयांची भर घातली आहे. त्यामुळे कर्नाटकातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 18 हजार कोटी रुपये पोहोचले आहेत.
"भारत एक ब्राइट स्पॉट"2014 पूर्वी भ्रष्टाचाराच्या काळात काँग्रेस सरकारच्या काळात जगाने भारताकडून सर्व आशा सोडल्या होत्या, असे रॅलीला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, भाजपला तुमच्या एका मताने संपूर्ण परिस्थिती बदलली. आज भारताची प्रतिष्ठा उंचावर आहे, अर्थव्यवस्थेचा वेग तेजीत आहे आणि जग भारताला एक ब्राइट स्पॉट म्हणून संबोधत आहे, असेही ते म्हणाले.