Karnataka Election 2023: आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा अखेरचा दिवस होता. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने जोरदार प्रचार केला. यावेळी विविध पद्धतीने प्रचार करण्यात आला. यादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हटके प्रचाराची चर्चा होत आहे. काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पक्षाचे राहुल गांधी बसमध्ये महिलांशी संवाद साधताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये राहुल गांधी बस स्टॉपवर काही महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नोकरदार महिलांशी संवाद साधताना दिसतात. त्यानंतर ते बीएमटीसीच्या बसमध्येही महिलांशी चर्चा करतात. यावेळी राहुलने महिलांना त्यांच्या कुटुंबाचीही विचारणा केली. या संवादादरम्यान राहुल गांधींनी महिलांना विचारले की, त्या दररोज प्रवास करतात, यादरम्यान त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते? या प्रश्नाच्या उत्तरात महिलांनी त्यांना रोजच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी सांगितल्या.
यावेळी महिलांनी महागाईमुळे त्यांचे बजेट बिघडत असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांनी आपल्या जाहीरनाम्यावर चर्चा करताना सांगितले की, काँग्रेस संपूर्ण कर्नाटकात महिलांसाठी बस सुविधा मोफत देण्याचे आश्वासन देत आहे. या चर्चेनंतर राहुल गांधी लिंगराजपुरम स्टॉपवर बसमधून खाली उतरले. दरम्यान, राहुल गांधींनी आतापर्यंत कर्नाटकमध्ये अनेक सभांना संबोधित केले आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. आता 10 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.