बेंगळुरू : कर्नाटकमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज 15 जागांवर मतदान घेण्यात आले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 66.25 टक्के मतदान झाले. याचबरोबर दक्षिणेतील एकमेव राज्यात असलेली भाजपाची सत्ता जाणार की राहणार याचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे.
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल 9 डिसेंबरला लागणार आहे. या निवडणुकीत मुख्य निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि जेडीएस वेगवेगळे लढत आहेत. या 15 जागांवर याच दोन्ही पक्षांचे आमदार होते. मात्र, भाजपाचे मुख्यमंत्री बी एस येडीयुराप्पा यांनी या आमदारांना फोडत राजीनामा देण्यास भाग पाडले होते. यामुळे कुमारस्वामी सरकार पडले होते.
कर्नाटक विधानसभेत रंगलेला सत्तासंघर्षाचा खेळ महाराष्ट्रातही रंगला होता. देवेंद्र फडणवीसांनी जशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली तशीच शपथ येडीयुराप्पांनीही दोन वर्षांपूर्वी घेतली होती. मात्र, संख्याबळ नसल्याने फडणवीसांसारखाच राजीनामाही देऊन टाकला होता. महत्वाचे म्हणजे भाजपा महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकमध्येही सर्वात मोठा पक्ष ठरला होता. नंतर येडीयुराप्पांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 17 आमदारांना फोडले आणि त्यांना राजीनामा द्यायला लावला. यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आले आणि काँग्रेससोबतची आघाडीही तुटली.
अथणी, होसकोट, हुंसुर, हिरकेरूर, कागवाड, गोकाक, येल्लापूर, राणीबेन्नूर, विजयनगर, चिक्कबळ्ळापीर, आरके पुरम, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट, शिवाजी नगर, कृष्णराजपेट या मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. भाजपाला सत्तेत येण्यासाठी सहा आमदारांची गरज आहे. भाजपाने काँग्रेस-जेडीएसच्या 15 पैकी 13 बंडखोर आमदारांना उमेदवारी दिली आहे.