कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपा उमेदवाराची माघार; काँग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 05:37 AM2018-11-03T05:37:34+5:302018-11-03T05:38:39+5:30
राम नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना तेथील भाजपाचे उमेदवार एल. चंदशेखर यांनी गुरूवारी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बंगळुरू : राम नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना तेथील भाजपाचे उमेदवार एल. चंदशेखर यांनी गुरूवारी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रकारामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता या येथून निवडणूक लढवित आहेत.
राम नगरची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. भाजपा उमेदवाराच्या माघारीने ही निवडणूक अनिता कुमारस्वामींसाठी अधिक सोपी झाल्याचे सांगितले जात आहे. माझे भाजपमध्ये माझे स्वागत करण्यात आले. पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा अथवा कोणीही माझ्या प्रचारात सहभागी झाले नाही. त्यामुळे भाजपामध्ये येताच मला राजकीय भवितव्याबाबत चिंता वाटू लागली.
एल. चंद्रशेखर हे वरिष्ठ काँग्रेस नेते सी.एम. लिंगप्पा यांचे चिरंजीव आहेत. तेही भाजपामध्ये जाईपर्यंत काँग्रेसमध्येच होते. या मतदारसंघात काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्यानंतर चंद्रशेखर भाजपामध्ये गेले होते. त्यानंतर भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. या घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते येडीयुरप्पा म्हणाले की, काँग्रेसचे नेते व मंत्री शिवकुमार यांनी पैशाच्या बळावर चंद्रशेखर यांना परत पक्षात नेले आहे.