Karnataka Election: कर्नाटकमध्ये काँग्रेसचं पारडं जड, बहुमत मिळणार की..., फायनल ओपिनियन पोलचे आकडे समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 05:04 PM2023-05-07T17:04:07+5:302023-05-07T17:05:03+5:30
Karnataka Assembly Election 2023: प्रचार संपायला आता काही अवधीच शिल्लक राहिला असताना कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील कल दर्शवणारे शेवटचे ओपिनियन पोल समोर आली आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यात तीन प्रमुख पक्ष असले तरी या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपामध्येच मुख्य चुरस दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेसकडूनभाजपा सरकारचा भ्रष्टाचार आणि जातियवादाच्या मुद्द्यांवरून आक्रमक प्रचार सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपाने पंतप्रधान मोदींविरोधात खर्गेंनी केलेली टिप्पणी आणि बजरंग दलावर बंदी घालण्याचं काँग्रेसने दिलेलं आश्वासन यांना प्रमुख मुद्दा बनवलं आहे. दरम्यान, प्रचार संपायला आता काही अवधीच शिल्लक राहिला असताना कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीतील कल दर्शवणारे शेवटचे ओपिनियन पोल समोर आली आहेत.
सी-वोटरने केलेल्या या ओपिनियन पोलनुसार कर्नाटकमध्ये अखेरच्या क्षणी काँग्रेसने आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. या ओपिनियन पोलनुसार २२४ जागा असलेल्या कर्नाटकच्या विधानसभेमध्ये काँग्रेसला ११० ते १२२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर भाजपाला ७३ ते ८५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. जेडीएसला २१ ते २९ आणि इतरांना २ ते ४ जागा मिळू शकतात.
कर्नाटकमधील विभागवार आकडेवारी पाहिल्यास ग्रेटर बंगळुरूमधील ३२ जागांपैकी काँग्रेसला १४ ते १८, भाजपाला १२ ते १६, जेडीएसला १ ते ४ आणि इतरांना ० ते १ जागा मिळू शकते. तर ओल्ड म्हैसूर भागात ५५ जागांपैकी काँग्रेसला २४ ते २८, जेडीएसला १९ ते २३, भाजपाला ४ ते ८ आणि इतरांना ० ते ३ जागा मिळू शकतात.
सेंट्रल कर्नाटकमधील ३५ जागांपैकी भाजपाला १० ते १४, काँग्रेसला २० ते २४, जेडीएसला ० ते २ आणि इतरांच्या खात्यात ० ते १ जाग जाऊ शकते. तर कोस्टल कर्नाटकमध्ये २१ जागांपैकी भाजपाला १३ ते १७, काँग्रेसला ४ ते ८ जागा मिळू शकतात. हैदराबाद कर्नाटकमधील ३१ जागांपैकी भाजपाल ६ ते १०, काँग्रेसला १८ ते २२, जेडीएसला ० ते २ आणि इतरांना ० ते ३ जागा मिळू शकतात. तर मुंबई कर्नाटकमध्ये ५० जागांपैकी काँग्रेसला २४ ते २८, भाजपाला २२ ते २६, जेडीएसला ० ते १ आण इतरांच्या खात्यात ० ते १ जागा जाऊ शकते