Karnataka Election: पुढच्या महिन्यात कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी इच्छुकांच्या पक्ष कार्यालयात चकरा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीते तिकीट मिळवण्यासाठी राज्यातील विविध मतदारसंघातील शेकडो काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी बंगळुरू येथील पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
ANI या वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मोठ्या संख्येने नेते आणि कार्यकर्ते हातात बोर्ड घेऊन कार्यालयाबाहेर निदर्शने करताना दिसत आहेत. याबाबत बोलताना कर्नाटककाँग्रेसचे कार्याध्यक्ष सलीम अहमद म्हणाले की, "पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. उद्या पक्षाची महत्वाची बैठक होणार आहे आणि यातच आम्ही तिकीट वाटपावर चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ. आम्ही सर्वे केलाय, जो जो सर्वोत्तम असेल त्याला तिकीट मिळेल."
रदरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जाहीर केल्यानुसार, राज्यात विधानसभा निवडणूक 10 मे रोजी एकाच टप्प्यात घेतली जाईल आणि 13 मे रोजी निकाल जाहीर होतील. 224 जागांपैकी सध्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) 119 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 75 आणि जनता दल (सेक्युलर) कडे 28 जागा आहेत. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023: महत्त्वाच्या तारखा- अधिसूचना जारी करणे: 13 एप्रिल 2023- नामांकन करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023- नामांकनांची छाननी: 21 एप्रिल 2023- उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2023- मतदान 10 मे 2023 रोजी आणि निकाल 13 मे 2023 रोजी लागेल.- कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे 2023 रोजी संपणार आहे