कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी बुधवारी मतदान झाले आहे. या मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमधून काँग्रेसला आघाडी मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र १३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीमधूनच अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे. त्यातूनच काँग्रेस २६ एप्रिलपर्यंत राखलेल्या आपल्या गतीमधून सत्ता मिळवण्यात यशस्वी होणार की, शेवटच्या पंधरवड्यात राबवलेल्या आक्रमक अभियानामधून जनतेला आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाला आहे, हे स्पष्ट होईल.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीला दोन टप्प्यांमध्ये विभाजित करता येऊ शकेल. एका टप्प्यामध्ये काँग्रेस आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून आलं. या निवडणुकीतील पहिला टप्पा हा २६ एप्रिल पूर्वीपर्यंतचा होता. तेव्हा काँग्रेसजवळ स्पष्टपणे स्थानिक अभियानाच्या आधारावर आघाडी होती. भाजपाविरोधात काँग्रेसने ४० टक्के कमिशन चार्ज आणि जनतेला दिलेल्या पाच हमींवर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यासाठी पक्षाकडून घरोघरी जाऊन मतदारांना माहिती देण्यात आली होती. त्यात महिला आणि बेरोजगारांना रोख मदत, २०० युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबाला १० किलो तांदूळ आणि महिलांना मोफत बस प्रवास यांचं आश्वासन देण्यात आलं होतं.
तर या निवडणुकीतील दुसरा टप्पा हा गेल्या आठवड्यामधील होता. जिथे काँग्रेसकडून झालेल्या तीन चुका भाजपाच्या पथ्थ्यावर पडल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या झंझावाती सभा आणि रोड शोमुळ भाजपाने प्रचारात कमबॅक केले. तसेच काँग्रेसने मिळवलेल्या आघाडीवर मात करण्याचाही प्रयत्न केला.
प्रचारादरम्यान, काँग्रेसने पहिला सेल्फ गोल २७ एप्रिल रोजी केला. तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख विषारी साप असा केला होता. तर २ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये बजरंग दलावर निर्बंध घालण्याचं आश्वासन देऊन काँग्रेसने दुसरी चूक केली. तर ७ मे रोजी सोनिया गांधी यांना सार्वभौमत्वाबाबतच्या विधानासाठी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जबाबदार ठरवण्यात आलं. प्रत्यक्षात सोनिया गांधी यांनी हे विधान केलंच नव्हतं.
कर्नाटकमधील सर्व प्रचार मोहिमेमध्ये काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थेट संघर्ष टाळून प्रचार स्थानिक पातळीवर केंद्रीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाजपाचा डबल इंजिनच्या विकास मॉडेलच्या माध्यमातून निवडणुकीचा अजेंडा राष्ट्रीय बनवण्याचा प्रयत्न होता. मात्र गेल्या १४ दिवसांमध्ये भाजपाने काँग्रेसने केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार मोहिमेमधून भाजपाला योग्य मार्गावर आणलं.
२७ एप्रिल रोजी आपल्या विषारी साप या टिप्पणीसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांनी खेद व्यक्त केला होता. तर बजरंग दलावरील बंदीच्या आश्वासनाचा संबंध बजरंगबलीशी जोडून भाजपाने अखेरच्या टप्पात हा प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला. त्यानंतर मोदींचे रोड शो आणि सार्वभौमत्वाबाबतच्या सोनिया गांधी यांच्या टिप्पणीवर भाजपाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे नेते, कार्यकर्त्यांना उत्साहित केले.
शेवटच्या दोन आठवड्यात काँग्रेसने केलेल्या तथाकथित चुका अंतिम निकालांमध्ये काँग्रेसला महागात पडू शकतात, असा भाजपाचा दावा आहे. तर मतदारांनी आपलं मत आधीच बनवलं आहे, या प्रश्नाचं उत्तर १३ मे रोजी येणाऱ्या निकालांमधून मिळेल.