Karnatak Election: "काँग्रेसची वॉरंटी संपलीय, गॅरंटीही खोटी आहे", कर्नाटकात नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:41 PM2023-05-02T13:41:42+5:302023-05-02T13:42:29+5:30
आपल्याला कर्नाटकला विकसित भारताचे ड्राइविंग फोर्स, ग्रोथ इंजिन बनवायचे आहे. त्यामुळे भाजपचे सरकार पुन्हा स्थापन करावे लागेल, डबल इंजिनचे सरकार आणावे लागेल, असे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले.
बंगळुरू : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या प्रमाणावर जनसभा होत आहेत. आज कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात एका सभेला नरेंद्र मोदींनी संबोधित केले. यावेळी स्वातंत्र्याच्या 'अमृत काल'मधील कर्नाटकची ही पहिलीच निवडणूक आहे. ही निवडणूक कर्नाटकला नंबर वन राज्य बनवण्याची निवडणूक आहे. येत्या 25 वर्षात कर्नाटक विकासाच्या कोणत्या उंचीवर जाईल, हे ही निवडणूक ठरवेल. आपल्याला कर्नाटकला विकसित भारताचे ड्राइविंग फोर्स, ग्रोथ इंजिन बनवायचे आहे. त्यामुळे भाजपचे सरकार पुन्हा स्थापन करावे लागेल, डबल इंजिनचे सरकार आणावे लागेल, असे उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले.
काँग्रेसचा इतिहास दहशतवादाचा आणि दहशतवाद्यांच्या तुष्टीकरणाचा आहे. दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली, तेव्हा दहशतवाद्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राइक झाल्यावर काँग्रेसने देशाच्या सैन्यदलाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. काँग्रेसची वॉरंटी संपली आहे, काँग्रेसची विश्वासार्हता संपली आहे. अशा परिस्थितीत वॉरंटीशिवाय काँग्रेसची गॅरंटी सुद्धा तितकीच खोटी आहे आणि खोट्या गॅरंटीचा काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड खूप जुना आहे, असे म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
कर्नाटकच्या जनतेला काँग्रेस आणि जेडीएस या दोघांपासून सावध राहावे लागेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस आणि जेडीएस हे दिसायला दोन पक्ष आहेत, पण ते दोघेही मनापासून आणि कृतीने सारखेच आहेत. दोघेही कुटुंबवादी आहेत, दोघेही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात आणि दोघेही समाजात फूट पाडण्याचे राजकारण करतात. कर्नाटकच्या विकासाला या दोन्ही पक्षांचे प्राधान्य नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस-जेडीएसच्या चुकीच्या कारभाराचा पुरावा म्हणजे अप्पर भद्रा सिंचन प्रकल्प. त्यांना शेतकऱ्यांची काळजी नव्हती, म्हणून त्यांनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केले. भाजपच्या डबल इंजिन सरकारने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. भाजपच्या विकासकामांशी काँग्रेस कधीही स्पर्धा करू शकत नाही. 2014 पूर्वी काँग्रेसने 10 वर्षांत जेवढी वैद्यकीय महाविद्यालये बांधली, भाजप सरकारने केवळ 9 वर्षांत दुप्पट वैद्यकीय महाविद्यालये बांधली, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
मोदींकडून भाजपच्या जाहीरनाम्याचे कौतुक
भाजपच्या जाहीरनाम्याचे कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आज मी राज्य भाजपच्या टीमचे आणि कर्नाटक भाजपच्या नेतृत्वाचे जाहीर अभिनंदन करतो. काल त्यांनी जे संकल्प पत्र जाहीर केले आहे, ते अतिशय चांगले संकल्प पत्र घेऊन आले आहेत. त्यात कर्नाटकला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याचा रोड मॅप आहे, त्यात आधुनिक पायाभूत सुविधांची ब्लू प्रिंट आहे, त्यात महिलांच्या सक्षमीकरणावर भर आहे.