अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले होते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बहुतांश वृत्तवाहिन्या आणि सर्व्हेक्षण संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमधून काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोलनी भाजपाच्या विजयाचं भाकित केलं आहे. तर काही एक्झिट पोलमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल हा त्रिशंकू लागेल आणि भाजपा व काँग्रेस या मुख्य पक्षांच्या लढाईत किंगमेकर बनण्याची संधी जेडीएसकडे चालून येईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष १३ मे रोजी लागणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे लागले आहे. याचदरम्यान, जेडीएसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या एका दाव्यामुळे काँग्रेस आणि भाजपाचं टेन्शन वाढलं आहे. जनता दल सेक्युलरसोबत युती करण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा संपर्क साधत असल्याचा दावा या पक्षानं केला आहे.
अनेक राजकीय विश्लेषकांनी भविष्यवाणी केली की, कर्नाटकमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल. तसेच त्यामध्ये काँग्रेसला आघाडी मिळेल. जनता दल सेक्युलरला किमान ३० जागा मिळतील आणि ते किंगमेकर बनतील, असा अंदाज काही विश्लेषक वर्तवत आहेत. त्यानंतर आता एचडी कुमारस्वामी हे केवळ किंगमेकरच नाही तर किंग बनण्यासाठीही तयार आहेत, असा दावा जनता दल सेक्युलरच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यातच जेडीएसचे राष्ट्रीय प्रवक्ते तन्वीर अहमद यांनी सांगितले की, दोन्ही राष्ट्रीय पक्ष निवडणुकीनंतर आघाडी करण्यासाठी त्यांच्या पक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यांनी सांगितले की, दोन्ही राष्ट्रीय पक्ष निश्चितपणे आमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही योग्यवेळी निर्णय घेऊ. आम्ही कर्नाटकच्या हिताच्यादृष्टीने निर्णय घेऊ, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या रिपोर्टनंतर कुमारस्वामी यांनी सिंगापूरला प्रयाण केले आहे. तिथून ते राष्ट्रीय पक्षांशी चर्चा करणार आहेत. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या इच्छेनुसार जेडीएसने काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
कर्नाटकमध्ये १९८५ पासून सत्तेत येणारा पक्ष पुन्हा सत्ता राखू शकलेला नाही. मात्र ही परंपरा खंडित करण्याता भाजपाचा प्रयत्न असेल. तर कर्नाटकमध्ये आत्मविश्वास वाढवणाऱ्या विजयाची अपेक्षा काँग्रेसला आहे.